जोर्वे सह सेवा सोसायटी तालुक्याच्या सहकाराची जननी — नामदार थोरात
विष कालवणाऱ्या प्रवृत्तीपासून दूर रहा !

७५ वर्षे पुर्तीनिमित माजी संचालकांचा सत्कार
प्रतिनिधी —
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात (दादा) यांच्या व आपल्या जीवनात जोर्वे सोसायटीचे महत्त्वाचे स्थान असून देशाच्या स्वातंत्र्याबरोबर या सोसायटीचा ही अमृत महोत्सव साजरा होतो आहे हा योगायोग आहे. ही ७५ वर्षांची वाटचाल अत्यंत कौतुकास्पद राहिली असून आपल्या यशामध्ये जोर्वे यासह तालुक्यातील सर्व गोरगरीब जनतेचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जोर्वे येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माजी संचालकांच्या सत्कार व वॉल कंपाऊंड चे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड माधवराव कानवडे, कांचन थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, गणपतराव सांगळे, संतोष हासे, सुरेश थोरात, माणिकराव यादव, संजय थोरात, शिवाजीराव दिघे, निखिल पापडेजा, सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय काकड व्हाईस चेअरमन सोपान कोल्हे, अनिल थोरात आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराची सुरुवात जोर्वेच्या सोसायटी पासून केली. तालुक्यातील सहकारची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने जोर्वे येथून रोवली गेली असून जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँकेत ही त्यांनी प्रतिनिधित्व केले. हे या सेवा सोसायटीसाठी अत्यंत अभिमानाचे आहे. दादांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांवर जोर्वे येथील सर्व संस्थांचा व संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचा अत्यंत काटकसरीने व पारदर्शकपणे कारभार सुरू आहे. ही परंपरा कायम जपत आपण जनतेच्या सहकार्याने राज्यात लौकिक निर्माण केला आहे. दादांच्या सहकारातील जीवनात व आपल्या ही राजकीय जीवनामध्ये जोर्वे गावासह येथील गोरगरीब नागरिकांचा मोठा वाटा राहिला आहे. यापुढेही सर्वांनी विकासाच्या पाठीमागे भक्कम उभे राहावे. काही मंडळी विष कालवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत आहे. अशा प्रवृत्ती पासून दूर राहावे असे आवाहन केले

ॲड. माधवराव कानवडे म्हणाले की, संगमनेरच्या सहकाराची वाटचाल ही जोर्वे येथून झाली आहे. आज नामदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा भरभराटीला आला असून संगमनेर तालुक्यातील सहकाराची संस्कृती ही आदर्शवत आहे. संपूर्ण जिल्ह्यात सोसायटीच्या वसुलीची परंपरा देणारा संगमनेर तालुका आहे. हीच वाटचाल आपल्या सर्वांना कायम ठेवायचे आहे.

इंद्रजीत थोरात म्हणाले की, ७५ वर्षे सेवा सोसायटीच्या कारभारामध्ये जोर्वे गावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगला काम केले आणि म्हणून हे यश मिळाले आहे. हीच परंपरा आपल्याला पुढे कायम ठेवताना वसुली जास्तीत जास्त देत गावाने आपला अग्रक्रम राखावा असेही ते म्हणाले. यावेळी उपसभापती नवनाथ अरगडे, शिवाजी जगताप, तुषार दिघे, दत्तू खुळे, आदी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हाईस चेअरमन सोपान कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन रामदास काकड यांनी केले. तर वाल्मिक दिघे यांनी आभार मानले. गावातील या संस्थेच्या सर्व माजी संचालकांचा सत्कार करण्यात आला.
