संगमनेर तालुक्यातील दलित वस्ती सुधार योजनेसाठी १ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर

प्रतिनिधी–

संगमनेर तालुक्यातील दलित वस्त्यांमध्ये विविध विकास कामांसाठी नव्याने १ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंद्रजित थोरात यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देतांना थोरात म्हणाले कि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२१ – २०२२ अंतर्गत नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचीत जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा व गावांचा विकास करण्यासाठी व या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी स्थानिक लोकप्रतीनिधी यांनी सुचविलेल्या कामांसाठी तालुक्यात १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याअंतर्गत संगमनेर नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यााचे सुशोभीकरण, साकूर येथील सोनवणे वस्ती ते बिरोबा माळ रस्ता काँक्रेटीकरण, कौठे धांदरफळ येथील निळे वस्ती रस्ता काँक्रेटीकरण, खरशिंदे येथील पंडीत वस्ती रस्ता काँक्रेटीकरण, शिंदोडी येथील खांमकर वस्ती रस्ता काँक्रेटीकरण, समनापूर येथील समनापूर शिवरस्ता ते रुपवते वस्ती रस्ता खडीकरण, वडगांव पान येथील काका नगर रस्ता काँक्रेटीकरण, आश्‍वी बु. येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये नविन सभागृह बांधकाम करणे, तळेगांव दिघे येथे मागासवर्गीय स्मशान भूमीत पेव्हींग ब्लॉक बसविणे, देवकौठे येथील मोकळ वस्तीत सामाजिक वस्तीगृह बांधणे, रायते येथे मागासवर्गीय वस्तीपर्यंत रस्ता काँक्रेटीकरण, जांभूळवाडी येथे केंगार वस्तीत अंतर्गत रस्ता करणे, हिवरगांव पावसा येथे हरीजन वस्ती रस्ता काँक्रेटीकरण, डाळासणे येथे कामधेनू नगर मिसाळ वस्ती रस्ता काँक्रेटीकरण करणे या कामांचा समावेश आहे.

महसूल मंत्री थोरातांच्या सक्षम व दुरदृष्टी नेतृत्वामुळे संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. निळवंडे कालव्यांची कामे अत्यंत गतीने सुरु असून संगमनेर शहरात येणार्‍या चारही बाजूच्या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. याचबरोबर पाझर तलाव दुरुस्तीसाठी ५ टप्प्यात सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विविध भागात रस्त्यांसह विकासाची कामे सुरु आहेत.

अविश्रांत काम ही थोरात यांच्या कामाची पध्दत व विकास कामे हाच ध्यास ठेवून केलेली कामे यांमुळे ग्रामीण भागाला नवीन झळाळी मिळत आहे.

 

हा निधी मिळाल्याबद्दल संगमनेर, साकूर,कौठे धांदरफळ, खरशिंदे, शिंदोडी, समनापूर, वडगांव पान, आश्‍वी बु, तळेगांव दिघे, देवकौठे, रायते, जांभूळवाडी, हिवरगाव पावसा, डोळासणे या  गावांतील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!