नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह चार नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर आर्थिक लाभासाठी गैरप्रकार, फसवणूक आणि खोटी कागदपत्रे केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा !
संगमनेर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे फिर्याद अर्ज दिला.
पोलिसांच्या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

प्रतिनिधी —
नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यासह चार नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर आर्थिक लाभासाठी गैरप्रकार, फसवणूक आणि खोटी कागदपत्रे केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद संगमनेर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडे दिली आहे.
दिनांक २ मार्च २०२२ रोजी हा फिर्याद अर्ज पोलीस अधीक्षकांना दिला असून त्याच दिवशी रात्री उशिराने संगमनेर शहर पोलिस ठाण्यात देखील ही फिर्याद देण्यात आली आहे.
गणपुले यांनी दिलेल्या फिर्यादी अर्जामध्ये संगमनेर नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, विद्यमान अधिकारी, नगरसेवक आणि दस्तुरखुद्द नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत.

नगराध्यक्षा दुर्गा तांबे, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक दिलीप पुंड विश्वास मुर्तडक, किशोर पवार, नितीन अभंग या नगरसेवकांसह तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, स्थापत्य अभियंता पंकज मुंगसे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी फिर्याद करण्यात आली आहे.
संगमनेर शहरात नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या अमरधाम नूतनीकरण, सुशोभीकरण प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्याची फिर्याद करण्यात आली असून यामध्ये सुमारे पंचवीस लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपहार करण्याचा उद्देश वरील मंडळींचा होता. असा आरोप गणपुले यांनी केला आहे.

संगमनेरमध्ये अमरधाम बांधकाम नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे तीन निविदा तयार करून त्यातून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा उद्देश वरील मंडळींचा होता. असा आरोप दिलेल्या तक्रारीत गणपुले यांनी केला आहे.
अमर धाम चे काम पूर्ण झालेले असतानाही नंतर दोन निविदा काढून त्या द्वारे हा अपहार करण्याचा प्रयत्न असल्याचा त्यांचे म्हणणे आहे. संगमनेर नगर परिषदेने अमरधाम नूतनीकरण सुशोभीकरणासाठी तीन निविदा प्रसिद्धीस दिल्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यातील दोन निविदा या फक्त पैशाचा अपहार करण्यासाठी होत्या असा त्यांचा आरोप आहे.

नगरपालिकेने सुरूवातीला सर्वात प्रथम जी निविदा प्रसिद्ध केली होती ती निविदा एकूण ६३ लाख १९ हजार ७३३ रुपयांची होती. ही निविदा मंजूर करून ठेकेदाराला काम करण्यासाठी कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर ठेकेदाराला काम केल्यानंतर सर्व बिले अदा करण्यात आलेली आहेत.
त्यानंतर संगमनेर नगरपरिषदेने पुन्हा अमरधाम सुशोभीकरण नूतनीकरण यासाठी २४ लाख ८८ हजार रुपये किमतीची निविदा काढली. त्याचप्रमाणे ९ लाख १६ हजार रुपये खर्चाची देखील एक निविदा याच कामासाठी काढण्यात आली. एकंदरीत पाहता एकाच कामासाठी तीन निविदा काढण्यात आल्या. यातील काही रक्कम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आमदार निधीतून घेतला असल्याचे दिसून आलेले आहे.

पहिली निविदा रघुनाथ दत्तात्रय थोरात (रा. घुलेवाडी, संगमनेर) यांनी भरली व त्यांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. सदर कामाची दोन चालू देयके व एक अंतिम देयक ही फोटोसह तपासणी स्थापत्य अभियंता मुंगसे यांनी केलेली आहे. आणि त्याप्रमाणे देयके अदा देखील केलेली आहेत.
त्यानंतर नगरपालिकेने सर्व साधारण सभेत ठराव करून नगराध्यक्षा दुर्गा तांबे व सदस्य यांनी सुचवलेल्या कामात अमरधाम येथील विविध विकास कामे म्हणून नोंदविण्यात आली. त्यावरील अभियंता मुख्याधिकारी लेखा परीक्षक यांची टिप्पणी वाचून दाखवली. तसा ठराव असून या ठरावास किशोर पवार हे सूचक विश्वास मुर्तडक हे अनुमोदक आहेत.
हा विषय ठरावात पाठविण्यापूर्वी सुचवणारे सदस्य, अध्यक्ष, स्थापत्य अभियंता मुंगसे, शहर अभियंता सुतावणे, मुख्याधिकारी सचिन बांगर या सर्वांनी सुचवलेली कामे आधीच पूर्ण असल्याची कल्पना होती. तरीही पुन्हा असा ठराव करण्यात आला.

त्याच प्रमाणे नगर परिषदने पुन्हा ९ लाख १६ हजार रुपयाची निविदा मंजूर करताना ठराव करतेवेळी विविध सूचना करण्यात आल्या याचे सुचक नगरसेवक दिलीप पुंड व अनुमोदक नितीन अभंग हे आहेत. या निवेदन मधील मधील कामे देखील आधीच पूर्ण झालेले आहेत.
असे असताना सर्व वस्तुस्थिती माहीत असताना नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तत्कालीन मुख्याधिकारी सचिन बांगर, शहर अभियंता राजेंद्र सुतावणे, स्थापत्य अभियंता पंकज मुंगसे, नगरसेवक किशोर पवार, विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, दिलीप पुंड यांनी सर्वांनी संगनमताने, एक विचाराने आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने अमरधाम संगमनेर येथे पूर्ण झालेल्या कामासाठी पुन्हा नव्याने काम करावयाचे आहे असे दाखवून ठराव मंजूर करून घेतले.

त्याचप्रमाणे हे काम पूर्वी कोणत्याच निधीतून झालेले नाही असा खोटा दाखला जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकार्यालय, अहमदनगर यांना दिला. तसेच वरील प्रकारे सर्वसाधारण सभेत ठराव करून थेट सभागृहात देखील खोटी माहिती दिली. ह्या सर्व पद्धतीने वर नमूद केलेल्या सर्व व्यक्तींना पुर्वी करण्यात आलेल्या कामासाठी पुन्हा निविदा मागवल्या. त्यातून अपहार करण्यासाठी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे खोट्या टिपण्या वाचून दाखवल्या. त्याच्या आधारे फसवणुकीने ठराव मंजूर करून घेतले. जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी यांना खोटी हमीपत्र दिली व वरील सर्व कामे अपहाराच्या उद्देशाने लोकसेवक असताना व आपण केलेले कृत्य हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे माहीत असताना देखील कट करुन संगमनेर नगर परिषदेचा विश्वासघात केला व त्यातून रकमेचा अपहार करण्यासाठी खोटी कागदपत्र बनवली. त्याच्या आधारे अपहार फसवणुकीचा प्रयत्न केला. खोटे दस्तऐवज खरे आहेत असे भासवून निधी मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे दाखल केली त्यामुळे सार्वजनिक रकमांचा अपहार करण्याच्या उद्देशाने ते खरे म्हणून सादर केले. निविदा ज्याच्या नावाने मंजूर झाली असती त्याला सुद्धा अपहाराचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करून आर्थिक गुन्हा केला आहे.
म्हणून या सर्वांविरुद्ध माझी फिर्याद असून भारतीय दंड विधान प्रमाणे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी फिर्याद अर्जी ॲड. श्रीराम गणपुले यांनी दिली आहे.
