मुळा नदी पात्रात बेकायदेशीर रस्ता बनवणाऱ्या वाळू तस्करांना पारनेरच्या बड्या सत्ताधारी नेत्याचा आशीर्वाद !!
प्रतिनिधी —

मुरूम, माती, यंत्रांचा पुरवठा केल्याची चर्चा !
संगमनेर तालुक्यातील पठार भागातून वाहणाऱ्या मुळा नदीवर वाळू तस्करीसाठी मुरूम आणि मातीचा बंधारा घालून संगमनेर – पारनेरला जोडणारा बेकायदेशीर रस्ता तयार करण्यामध्ये पारनेरच्या एका मोठ्या नेत्याच्या सहभाग असल्याचे आणि वाळू तस्करांना आशीर्वाद असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. हा बडा नेता सत्ताधारी असल्याने त्याच्याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात मुळा नदीपात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीला पारनेर तालुक्यातील एका बड्या नेत्याचा आशीर्वाद असल्याची माहिती समोर आली आहे.
मुळा नदीच्या एका काठाला संगमनेर तालुका आहे. तर दुसर्या काठाला पारनेर तालुक्याची हद्द आहे. त्यामुळे संगमनेर आणि पारनेर दोन्हीकडून मुळा नदीचे लचके तोडण्याचे काम चालू आहे. दोन्हीकडून वाळू तस्करीला बड्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात असले तरी पारनेर तालुक्यातील ‘त्या’ बड्या नेत्याकडे अनेक वेळा कानाडोळा झालेला दिसून येतो.

हा बडा नेता मोठ्या पदावर असल्याने वाळू तस्करांवर कुठलीही कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. तसेच पारनेर पोलीस आणि पारनेर च्या महसूल विभागावर देखील या नेत्याचा दबाव असल्याची चर्चा आहे.

आठ दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यात पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथील खैरदरा परिसरातून पारनेर तालुक्यातील पवळदरा व इतर शिवारात पर्यंत नदीपात्रात मुरूम आणि मातीचा बांध घालून वाळू तस्करी साठी रस्ता तयार करण्यात आला होता.
पारनेरच्या बाजूला नदीपात्रात वाळू कमी असल्याने संगमनेरच्या पात्राच्या कडेने वाळू उपसा करून पारनेर तालुक्यातून वाहतूक करीत पुणे जिल्ह्यात विकायची असा काही वाळू तस्करांचा धंदा आहे. या वाळू तस्करीला ‘त्या’ बड्या नेत्याचा सपोर्ट आहे. त्यामुळे हा रस्ता करण्यात तयार करण्यात या बड्या नेत्यांचा मोठा सहभाग असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

कारण या रस्त्यासाठी माती आणि मुरमाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. मुरुमाचे प्रमाण पारनेरच्या बाजूला जास्त असल्याने तिकडून मुरमाचा पुरवठा झाला असल्याचे समजते. त्यामुळे हा रस्ता तयार करण्यात पारनेर तालुक्यातील वाळू तस्करांना मोठा जोर आलेला होता. वाळू तस्करांची एक मोठी लॉबीच पारनेरच्या ‘त्या’ नेत्याची समर्थक आहे.
त्यामुळे पारनेरचे काही वाळू तस्कर यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत पाहता संगमनेर व पारनेर तालुक्यातून होणाऱ्या वाळू तस्करीला बड्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याने वाळूतस्करांचे चांगलेच फावले आहे. ही वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू असून पुणे जिल्ह्यात वाळूला खूप मागणी आहे.

कितीही कारवाया झाल्या तरी वाळू तस्करी थांबत नाही. तर राजकीय नेते यामध्ये सहभागी असल्याने पोलीस आणि महसूल प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येते. परंतु काही असले तरी कायदा सर्वांसाठी समान असतो. त्याची जर निर्भीडपणे अंमलबजावणी केली तर कुठलाही नेता काहीच करू शकत नाही. पण पोलीस आणि महसूल विभागाचे देखील हात यात ‘बरबटलेले’ असल्याने त्यांचेही कारवाई करण्याचे धाडस होत नसल्याचे आरोप होतात. त्यामुळे संगमनेर आणि पारनेर तालुक्यात होणार ही वाळू तस्करी कधी थांबेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
