संगमनेरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले वाळू तस्कर शोधणे सोपे झाले..! 

महसूल व पोलिस विभागाकडून कारवाई ची प्रतीक्षा !! 

वाहतुकीला अडथळा करणारे उघड होतील…

रात्रीस चालू असलेले अवैध खेळ बंद होतील ?

 

प्रतिनिधी —

शिवजयंतीच्या दिवशी संगमनेर शहरातील सुरक्षा प्रणाली म्हणून ३९ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून तयार करणार आलेल्या यंत्रणेचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला.

लोकार्पण करते समयी महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहर ‘हायटेक’ करणार असल्याचे सांगितले त्यामध्ये वाय फाय झोन आणि शहरात नव्याने ६० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. हे कॅमेरे ‘फेस डिटेक्शन’ करणारे असतील असे सांगण्यात आले आहे.

 

तहसील कार्यालय आवारात झालेल्या या कार्यक्रमाला नगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह पोलीस खात्याचे आणि महसूल विभागाचे लहान- मोठे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक विकास निधीतून ही यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. सुमारे १५ लाख रुपये या योजनेसाठी खर्च करण्यात आले आहेत. संगमनेर नगरपालिकेने या कामी पुढाकार घेतला आहे. या सर्व यंत्रणेची कंट्रोल रूम पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. तेथे बसवण्यात आलेल्या टीव्ही स्क्रीनवर शहरात घडणाऱ्या घटना, हालचाली, घडामोडी दिसणार आहेत. त्यावर पोलिसांचा डोळा असणार आहे.

संगमनेर शहरासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कॅमेरे बसवल्यामुळे आणि यंत्रणा सुरू केल्यामुळे संगमनेर नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. चुकीच्या गोष्टींना आळा बसेल असे त्यांचे म्हणणे आहे.

आता अनेक लहान मोठ्या चोऱ्यामाऱ्या पकडण्यात पोलिसांना यश येईल. मोटारसायकल चोरी, गंठण, सोनसाखळी चोर,  पाकीटमारी, गाड्यांच्या छोटे-मोठे अपघात, ट्रॅफिक जाम, भांडणे वगैरे यावर पोलिसांना लक्ष ठेवता येईल.

शहरातून होणारी वाहतूक अत्यंत नियम मोडणारी हलगर्जी पणाची असते. रिक्षा थांबे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीला अडचण करतात. अस्ताव्यस्त प्रकारे लावलेल्या दुचाकी गाड्या चुकीच्या व्यवस्थित पार्किंग न केलेल्या रिक्षा वाहनांची वर्दळ यामुळे रस्त्यांवर नेहमीच अडचणी होत असतात. आता  सिसीटीव्ही  कॅमेऱ्यामधून पोलिसांना हे सर्व दिसणार आहे. त्यामुळे यावरही नियंत्रण मिळवून सुधारणा करता येईल.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यात आरडा-ओरडा होत असलेल्या संगमनेर तालुक्यातील वाळू तस्करीचा धंदा यावरही काही प्रमाणात शहरातून होणाऱ्या अवैध तस्करीवर नियंत्रण आणता येईल.

संगमनेर शहरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी चालते. प्रवरा नदीपत्रातून वाळू चोरुन ही वाळू ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि गाढवांचा वापर करून संपूर्ण शहरात रात्रीतून पोहोचविण्यात येते. यांमध्ये रिक्षा, युटिलिटी व्हॅन, जीप, मारुती व्हॅन अशा स्क्रॅप गाड्यांचा वापर केला जातो. दिवसा बैलगाडी, गाढवं यांचा वापर करून वाळू तस्करी केली जाते. रात्री बाकीच्या वाहनांचा वापर करून वाळू तस्करी सुरू असते.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे आणि अत्याधुनिक कॅमेरे असल्याने आता रात्री वाळू तस्करी कुठुन कशी होते. शहरातून रात्रीच्यावळी प्रवरा नदी परिसरातील पुणे नाका, नाईकवाड पुरा, परदेश पुरा, रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक तसेच म्हाळूंगी नदीच्या बाजूने माळीवाडा, हेल्थ क्लबच्या बाजूने शहरात येणाऱ्या व सर्वच बाजूने सुरु असलेल्या वाळू तस्करीचे छायाचित्रण आपोआपच होणार आहे. या छायाचित्रणावर लक्ष ठेवून काही दिवसातच पोलिस आणि प्रशासनाला थेट वाळू तस्करांवर कारवाई करणे सोपे होणार आहे.

त्यामुळे इतर अवैध उद्योगां बरोबरच वाळू तस्करीला आळा बसू शकतो. आता एवढेच महत्वाचे आहे की, या सीसीटीव्ही यंत्रणेचा पोलीस आणि महसूल प्रशासन कशाप्रकारे उपयोग करते. चोर भामट्यांना आणि तस्करांना मोकळीक देऊन या यंत्रणेचा सर्वसामान्यांवर दबाव आणण्यासाठी वापर झाला तर या यंत्रणेचा कुठलाही उपयोग होणार नाही. त्यामुळे ह्या यंत्रणेचा उपयोग अवैध धंद्यांवर, वाळू चोरी, गौण खनिज चोरी, शहरातून होणाऱ्या इतर चोऱ्यामाऱ्या यावर कारवाई करण्यासाठी, त्याला आळा बसवण्यासाठी, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अत्यंत काटेकोर पणे उपयोग व्हावा हिच प्रतीक्षा नागरिक करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!