वाळू तस्करी साठी मुळा नदीपात्रात रस्ता तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल !
प्रतिनिधी —
वाळू तस्करी साठी मुळा नदी पात्रात अवैध रस्ता तयार करणाऱ्या दोघा जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे
राजू श्रीरंग डोंगरे व अविनाश रोहिदास डोंगरे (रा. जांबूत बुद्रुक ता. संगमनेर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात मुळा नदी पात्रात माती मुरमाचा बांध घालून वाळू तस्करी करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला होता. हा रस्ता संगमनेर तालुक्यातील खैरदरा पासून ते पारनेर तालुक्यातील पवळ दरा दरम्यान तयार करण्यात आला होता.

रस्ता केल्याचे उघडकीस आल्यानंतर बराच गदारोळ उठला होता. महसूल खाते आणि प्रशासन टार्गेट झाले होते. वाळू तस्करांचा हैदोस जनतेसमोर आला होता. खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाने हा रस्ता बुलडोझरने तोडून टाकला. त्यानंतर हा रस्ता तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळच्या खैरदरा परिसरातील मुळा नदीपात्रात दगड-मातीचा भराव टाकत वाळू तस्करांनी सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा रस्ता बनविला होता. जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करत रात्र-दिवस वाळू वाहतूक सुरू होती.

हा रस्ता महसूल प्रशासनाने उखडून टाकला. मात्र, नदीपात्रातील अवैध रस्ता प्रकरणी कुणावरही कारवाई झालेली नव्हती. महसुलच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून वाळू उपशाची दखल घेतली जात नसल्याने तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथील ग्रामस्थांनी गुरुवारी अवैध वाळू उपशाबाबत थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली.

त्यानंतर महसूल विभाग खडबडून जागे झाले. नांदूर खंदरमाळ गावचे तलाठी युवराजसिंग जारवाल यांनी खैरदरा येथील मुळा नदीपात्रात जाऊन पंचनामा केला. व फिर्याद दाखल केली. नदीपात्रामध्ये वाळू मुरूम टाकून नैसर्गिक नदीपात्रामध्ये भराव तयार करून मुळा नदीपात्राचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश लोंढे हे करीत आहेत.
