चक्क पाण्यामध्ये बैलगाडी घालून चालू आहे वाळू तस्करी !
गंगामाई घाट, केशव तीर्थ, मारुती मंदिरासमोरून चालू आहे वाळू चोरी

प्रतिनिधी —
‘प्रवरा नदीपात्रात पाणी असो अथवा नसो तुमच्या नाकावर टिच्चून आम्ही वाळूतस्करी करणार म्हणजे करणारच’ जणूकाही संगमनेरच्या महसूल प्रशासनाला असा इशारा देत चक्क संगमनेर शहरात गंगामाई घाटाच्या समोर प्रवरा नदी पात्रातून पाणी असताना देखील बैलगाडीचा वापर करून दिवसाढवळ्या वाळूची तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे.

प्रवरा, मुळा, म्हाळुंगी या नद्यांमधून ग्रामीण भागात वाळू तस्करी सुरू असली तरी शहरात सुद्धा प्रशासनाच्या डोळ्यादेखत वाळूतस्कर वाळू चोरी करीत असल्याचे नेहमीच दिसून येते. प्रवरा नदी पात्रात पाणी नसताना वाळू तस्करीला उधाण आलेले असते. मात्र यावर विविध पर्याय शोधत वाळूतस्करांनी नदीपात्रात पाणी असून देखील वाळू तस्करी चे पर्याय शोधले आहेत.

ग्रामीण भागात निंबाळे शिवारात ट्रॅक्टरल फनी लावून पाण्यातून वाळू ओढून वाळू तस्करी सुरू असल्याचे आठ दिवसांपूर्वीच उघड झाले होते. आता संगमनेर शहरात प्रवरा नदीपात्रात केशव तीर्थ आणि गंगामाई घाटाच्या समोर दक्षिण बाजूस प्रवरा नदी पात्रात पाणी असताना दिवसाढवळ्या वाळू तस्करी केली जात आहे.
यासाठी बैलगाडीचा वापर केला जातो. या बैलगाड्या संगमनेर खुर्द च्या बाजूने प्रवरा नदीपात्रात उतरवल्या जातात. पहाटे सुरू होणारा हा वाळूतस्करीचा धंदा अगदी दिवसाढवळ्या सुरू असतो.

वाळू तस्करी साठी गाढवे वापरून शहरात वाळू तस्करी सुरू असते. गाढवांचा वापर करतानाच बैलगाडीचा देखील वापर आता होऊ लागला आहे. यापूर्वीही बैलगाडीचा वापर होत होता. मात्र आता पात्रात पाणी असताना नदीतून वाळू काढण्यासाठी बैलगाडीचा वापर करण्यात येत आहे.
वाळू तस्कर चोरी साठी कोणत्या वाहनाचा वापर करतील हे सांगता येत नाही. आऊटडेटेड रिक्षा, स्क्रॅप मध्ये निघालेल्या युटिलिटी व्हॅन, जीप, मारुती व्हॅन इतर गाड्यांचा वापर करीत शहरातून वाळू तस्करी सुरू असते.

रात्रीच्या वेळी ह्या वाळू तस्करीला उधाण आलेले असेल. तर शहरातील रंगार गल्ली, परदेशपूरा, वाडेकर गल्ली, चंद्रशेखर चौक या भागातील नागरिकांच्या ‘झोपेचे खोबरे’ झालेले असते.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरातून देखील वाळू तस्करी सुरू असल्याने महसूल विभागातले गाढवं नेमके काय करतात असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक करीत असतात त्याला. उत्तर देण्याची हिंमत संगमनेरच्या प्रशासनात नाही.

गंगामाई घाट परिसरातून होणाऱ्या वाळू तस्करी वर पर्यावरणप्रेमी नागरिकांनी, शहरातल्या व्यापाऱ्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. महसूलमंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तरीही वाळू तस्करी थांबलेली नाही. महसूल मंत्री यांचा प्रभाव किती आहे आता हे या लोकांना समजून आले असेल अशी प्रतिक्रिया यातील सदस्य देतात.
एकंदरीत पाहता संगमनेर मध्ये मंत्रीपद असो, नाहीतर नसो संगमनेरच्या महसूल प्रशासनाला पोलिसांना कुठलाही फरक पडत नाही. संगमनेर शहर आणि तालुक्यातल्या विविध अवैध तस्करांची सध्या चलती सुरू असल्याचे दिसून येत आहे.

