मुळा नदी पात्रातील वाळू तस्करीचा चेंडू आता थेट विभागीय आयुक्तांच्या कोर्टात !

जांबुत ग्रामपंचायतीच्या वतीने दिले निवेदन
संगमनेर महसूल विभागाकडून कुठलेही कारवाई होत नसल्याची तक्रार
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागातून होणाऱ्या मुळा नदीतील वाळू तस्करी बाबत ग्रामस्थांनी आता थेट विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात गाजत असलेला हा ‘वाळूतस्करी चेंडू’ आता आयुक्तांच्या कोर्टात जाऊन पडला आहे.

तालुक्यातील जांबूत परिसरातील अवैध वाळू तस्करीची महसूलच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांना हा पवित्रा घ्यावा लागला आहे.
जांबूत ग्रामस्थांनी अवैध वाळू उपशाला ग्रामपंचायतीचा ठराव करून विरोध दर्शविला आहे. तरी देखील जांबूत, खैरदरा, खंदरमाळवाडी या परिसरातून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. खैरदरा येथे वाळू तस्करांनी थेट मुळा नदीत रस्ता तयार केला होता. याबाबत महसूल, पाटबंधारे व पोलीस विभागाने काहीही कारवाई केली नाही. माध्यमांतून हा प्रकार समोर आल्यानंतर वाळू तस्करांनी या रस्त्याची उंची कमी करत तो पाण्याखाली दडवला आहे. त्यामुळे आजही या परिसरातून वाळू उपसा सुरूच आहे.

एवढा प्रकार होऊनही पठार भागातील वाळू उपसा बिनदिक्कतपणे सुरू आहे. या वाळू उपश्याला रात्री उधाण आलेले असते. रात्रीच्या अंधारात हा सगळा खेळ चालू असतो. संगमनेरचा महसूल विभाग यावर कायमस्वरूपी कारवाई करण्यास असमर्थ ठरलेला असल्याचे उघड झाले आहे.
जांबुत ग्रामपंचायतीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, स्थानिक पातळीवर अनेक वेळा तक्रार करूनही कुठलीही कारवाई होत नाही. मुळा नदी पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. नदीकाठच्या धड्या २५ – २५ फूट खोल झाल्या आहेत. या वाळूचोरी मुळे होणाऱ्या खड्ड्यांमुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलू शकतो. हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात, घरात जाऊ शकते. असा धोका निर्माण झाला आहे.

या संबंधाने तक्रार केल्यास तक्रार करणाऱ्या तरुणांना तस्करांकडून दादागिरी केली जाते. जातीवाचक शिवीगाळ केली जाते. असे प्रकार वारंवार होऊन देखील कुठलीही दखल घेतली जात नाही. अशी कैफियत या निवेदनातून विभागीय आयुक्त यांच्या कडे मांडण्यात आलेली आहे.

विभागीय आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर काय कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
मुळा नदीतून संगमनेर तालुक्याच्या हद्दीतील खैरदरा येथून पारनेर तालुक्याच्या पवळदरा, मुंजेवाडी, आभाळवाडी, अकलापूर, बोटा मार्गे आळेफाटा तसेच खंदरमाळ मार्गे आळेफाटा व पारनेर तालुक्यातील
टाकळी ढोकेश्वर मार्गे वाळू तस्करी होत आहे.
याबाबत पोलीस, महसूल विभाग यांनी संयुक्त कारवाई करून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, जिल्हा प्रशासन डोळेझाक करताना दिसत आहे.

पोलीस अधीक्षकांनी वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे निर्देश देताच घारगाव पोलिसांकडूनच ही खबर वाळू तस्कारपर्यंत पोहोचते, अशीही चर्चा आहे.

