अल्पवयीन मुलीला व्हिडीओ कॉल करून अश्लील शब्दात छळ करणाऱ्या तरुणाला अटक !

पोलीस कोठडीत रवानगी
संगमनेर तालुक्यातील घटना
प्रतिनिधी —
अल्पवयीन मुलीला वारंवार फोन वरून मेसेज करून आणि अश्लील व्हिडिओ कॉल करून छळ केल्या बद्दल संगमनेर तालुका पोलिसांनी एका तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात ही घटना घडली असून त्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत भाऊराव नेहे असे आरोपीचे नाव आहे.

सदर तरुणाला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबतची हकीकत अशी आहे की, सदर आरोपी प्रशांत नेहे हा संबंधित मुलीला वेळोवेळी ती शाळेत जाता-येता पाठलाग करून तिला त्रास देत होता. तसेच सदर मुलगी अभ्यास साठी वापरत असलेल्या तिच्या वडिलांच्या मोबाईल नंबरवर तू मला खूप आवडतेस असे आणि इतर अश्लील मेसेज करून त्रास देत होता. त्याचप्रमाणे त्या मुलीला व्हिडिओ कॉल करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता.

या सर्व प्रकाराला वैतागून सदर मुलीने संगमनेर तालुका पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर प्रशांत नेहे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हेगार हा त्या मुलीच्या सुमारे एक महिन्यापासून मागे लागलेला होता.
वेळोवेळी तो तिला शाळेच्या रस्त्यावर येता जाता त्रास देत होता. कधी कधी पहाटे फोन करत होता. आणि त्रास देत होता. असा प्रकार सातत्याने होत होता. निर्ढावलेल्या या तरुणाला कसलीच भीती वाटत नव्हती. सदर मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

संगमनेर तालुका पोलिसांनी आरोपी प्रशांत नेहे याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार सह गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड हे करीत आहेत.
