बनावट लेबल आणि गोण्या वापरून खतांची विक्री !

मार्केट यार्ड मधील कृषी सेवा केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे येथील कंपनीच्या अधिकाऱ्याची फिर्याद
प्रतिनिधी —
नामांकित नोंदणीकृत कंपनीचे बनावट लेबल, खतांच्या पिशव्या, गोण्या वापरून त्यात बोगस दर्जाच्या खतांची विक्री करून कंपनीला फसवले. या दर्जाहीन खतामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती येथील रोहिणी कृषी सेवा केंद्राच्या संचालकांविरुद्ध संगमनेर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कृषी सेवा केंद्र चालक सिताराम मारुती गुंजाळ यांना आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी मुंढवा, जिल्हा पुणे येथिल कंपनीतील अधिकाऱ्याने फिर्याद दिली असून त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
स्मार्टकम टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीच्या बनावट पिशव्या आणि गोण्या तयार करून शहरातील मार्केट यार्ड याठिकाणी रोहिणी कृषी सेवा केंद्र या दुकानाचे चालक सिताराम मारुती गुंजाळ यांनी मालाची विक्री केली.

सदर कंपनीच्या खतांच्या बॅग सारख्या बनावट बॅग प्रिंट करून घेऊन त्यात बनावट उत्पादन व चांगली प्रत नसलेल्या खताची विक्री केली. या प्रकारामुळे स्मार्टकम टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीची बदनामी झाली. तसेच या कंपनीला मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागला. कंपनीची विश्वासार्हता धोक्यात आली. तसेच या कृषी सेवा केंद्र चालकाने गोण्या आणि पिशव्यांवर लावण्यात येणारे लेबल देखील बनावट वापरले असून आतील माल देखील बनावट असल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे अधिकारी आझम शहा इबाद शाह यांनी संगमनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यानुसार सिताराम गुंजाळ याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
