महसूल विभाग ॲक्शन मोडमध्ये !
मुळा नदीत बेकादेशीर रस्ता करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार –

प्रतिनिधी —
वाळू तस्करी साठी मुळा नदी पात्रात मातीचा बंधारा घालून रस्ता तयार करणाऱ्या वाळू तस्करांवर मग ते वाळूतस्कर असो किंवा रस्ता तयार करणारे इतर दुसरे कोणी असो या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.
पठार भागातील मुळा नदीपात्रात खैरदरा या परिसरात काही दिवसांपूर्वी वाळूतस्करांनी मातीचा बंधारा घालून पारनेर तालुक्यातील पवळदरा परिसरा पर्यंत हा रस्ता निर्माण केला होता. अतिशय बेकायदेशीररीत्या पाणी अडवून, पाण्यामध्ये मोठा बंधारा घालून हा रस्ता तयार करण्यात येऊन यावरून वाळू तस्करी सुरू होती. वाळूतस्करी बरोबरच इतरही काही अवैध कामांसाठी याचा वापर केला जात होता की काय अशी शंका प्रशासनास आहे.

सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून या बेकायदेशीर रस्त्याचे गुपित उघड झाल्यानंतर संगमनेरच्या महसूल विभागाने बुलडोजर च्या साह्याने हा रस्ता उखडून टाकला होता.
त्यानंतर आता हा रस्ता तयार करणारे, रस्ता तयार करवून घेणारे, यासाठी ज्यांची यंत्रसामग्री वापरण्यात आली आहे ते, तसेच हा रस्ता करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी विशेष प्रयत्न आणि परिश्रम घेतले अशा सगळ्यांचा शोध घेऊन त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहेत.

वाळूतस्करांनी मुजोरपणे केलेल्या या धाडसी कृत्यामुळे संगमनेरचा महसूल विभाग आता ‘ॲक्शन मोड’ मध्ये आला असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

