संगमनेर नगरपालिकेचा कारभार विधानसभेत धारेवर !
आमदार अमोल खताळ यांचा कथित भ्रष्टाचारावर थेट हल्लाबोल
पाणीपुरवठा, रस्ते, कत्तलखाना, सांडपाणी प्रकल्प, भुयारी गटार योजना आणि नगरपालिकेच्या कारभारावर सरकारचे लक्ष वेधले
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहर व तालुक्यातील नागरी समस्यांवर आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार, भुयारी गटार योजनेतील अनियमितता, कत्तलखाना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा अभाव आणि शहर विकास आराखड्यापर्यंत अनेक प्रश्न सभागृहात मांडत त्यांनी सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली.

नगरपालिकेच्या शाळांची दुरवस्था, भुयारी गटार योजनेतील कथित भ्रष्टाचार, नाल्यांवरील अतिक्रमणे आणि शहरासाठी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित सुधारित विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच शहरालगतच्या गावांचा नगरपालिकेत समावेश करून हद्दवाढ करण्याची मागणीही त्यांनी केली.
कत्तलखान्याच्या मुद्द्यावर बोलताना, संगमनेर नगरपालिकेच्या हद्दीतील सर्व्हे क्रमांक २१४ येथील कत्तलखाना शासनाच्या नियमांना हरताळ फासून शहराच्या हद्दीत आणि नदीलगत सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून हा कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे दूषित पाणी थेट प्रवरा आणि म्हाळुंगी नदीत सोडले जात असल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे नगरपालिकेला भरावा लागणारा दंड हा नागरिकांच्या कराच्या पैशातून भरला जात असल्याची टीका करत, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली.
