राजकारण्यांनो, आता तरी जागे व्हा ! तुमच्या भांडणामुळे शिर्डीला गेलेली संगमनेरची रेल्वे परत येईल की नाही ?
“कोण नेता हवा, कोण नको” यापेक्षा संगमनेरचा हक्क महत्त्वाचा
संगमनेरची रेल्वे शिर्डीला पळवून नेली. पळवून नेणारे कोण ? ज्यांच्यावर संशय आहे, तेच जर पळवून नेणारे असतील तर ‘हुरळली मेंढी आणि लागली लांडग्याच्या मागे” अशी संगमनेरच्या नेत्याची अवस्था झाली असल्याचे बोलले जात आहे.
संगमनेर | प्रतिनिधी
नाशिक–पुणे रेल्वेच्या मूळ संगमनेर मार्गाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच राजकीय होत चालला आहे. संगमनेरच्या विकासाचा कणा ठरू शकणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाचवण्यासाठी सर्वपक्षीय लढा उभा राहण्याची अपेक्षा असताना, उलट “कोण नेता हवा, कोण नको”, “कोणाच्या नेतृत्वाखाली आंदोलन करायचे” यावरच लोकप्रतिनिधींमध्ये चल बिचल सुरू आहे. त्यामुळे जनतेतून आता एकच सवाल विचारला जात आहे—राजकारण मोठे की संगमनेरचा हक्क?

आमदार सत्यजित तांबे यांची आमदार अमोल खताळ यांच्या वक्तव्या संदर्भात सोशल मीडियातून एक पोस्ट व्हायरल होत आहे. यापूर्वी “रेल्वे पळवून न्यायला ती नेहरू गार्डन मधली रेल्वे आहे का?” असे वारंवार म्हणणारे आमदार खताळ आज रेल्वेच्या प्रश्नावर थोडसं सकारात्मक बोलत आहेत, याचा आंनद आहे. हा शुद्ध टोमणा असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
दुसरीकडे, खासदार अमोल कोल्हे यांनी या रेल्वेसाठी यापूर्वीच आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे. मात्र, आमदार अमोल खताळ यांनी या आंदोलनासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केल्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सामान्य नागरिकांचा सूर स्पष्ट आहे—संगमनेरची रेल्वे परत मिळवायची असेल तर ती दुसऱ्यांच्या नेतृत्वाच्या किंवा झेंड्याच्या आधारावर नव्हे, तर संगमनेरच्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढल्याशिवाय शक्य नाही.
आज परिस्थिती अशी आहे की, “तांबे नको, थोरात नको, कोल्हे नको, खताळ नको, विखे नको” असा सर्वांचाच एकमेकाच्या बाबतीत छुपा अजेंडा आहे. पण “संगमनेरला रेल्वे हवी” या एकाच मुद्द्यावर सर्वजण मतभेद बाजूला सारून एकत्र येताना दिसत नाहीत. त्यामुळे जनतेत नाराजीचा सूर आहे.
काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तर थोरात – विखे – तांबे आणि खताळही नको आहेत. त्यांचा आपला ‘वेगळा प्रोग्राम’ सुरू आहे. आपली संघटना आणि संघटनेचे अस्तित्व किती आहे हे त्यांना माहीत आहे परंतु स्वतःचे अस्तित्व नेत्यांसमोर दाखवण्यासाठी ते देखील आपले वेगळे महत्त्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे नुकसान मात्र सामान्य जनतेचे होत आहे.

नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, खेड, मंचर आणि पुणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या भवितव्याशी संबंधित असलेला हा प्रकल्प राजकीय अहंकाराचा बळी ठरत असल्याची भावना दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
जनतेतून आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत—”राजकारण्यांनो, तुमच्या भांडणात नाशिक–पुणे रेल्वेचा मूळ संगमनेर मार्ग गेला. निदान याची तरी ×× बाळगा. श्रेयासाठी भांडण्यापेक्षा संगमनेरचा हक्क परत मिळवण्यासाठी एकत्र या.”

रेल्वेचा संघर्ष हा कोणत्या एका पक्षाचा किंवा एका नेत्याचा नाही; तो संपूर्ण उत्तर पुणे जिल्हा, संगमनेर, अकोले, सिन्नर आणि नाशिक परिसराच्या विकासाचा संघर्ष आहे. त्यामुळे आता आरोप -प्रत्यारोप थांबवून, छुपे अजेंडे थांबवून एकदिलाने लढण्याची वेळ आली आहे. अन्यथा इतिहासात अशी नोंद होईल की, राजकीय कुरघोड्यांमुळे संगमनेरच्या विकासाची रेल्वे कायमची दुसऱ्या मार्गाने निघून गेली.
