चौक जिवंत राहिले तरच लोकशाही जिवंत राहील !

संगमनेरची चौक संस्कृती राजकीय गटबाजीच्या विळख्यात ; जनआंदोलनांची परंपरा धोक्यात

 

संगमनेरचे चौक पुन्हा लोकशाहीचे व्यासपीठ बनणार, की राजकीय गटबाजी, सामाजिक दुरावा आणि परस्पर अविश्वासाच्या विळख्यात त्यांची ऐतिहासिक ओळख कायमची हरवणार ? 

 

राजा वराट | संगमनेर 

संगमनेर हे केवळ व्यापारी शहर नाही, तर सामाजिक चळवळी, लोकसहभाग आणि जनआंदोलनांची समृद्ध परंपरा जपणारे शहर म्हणून राज्यभर ओळखले जाते. या परंपरेचा सर्वात महत्त्वाचा आधार होता तो शहरातील चौक. हे चौक केवळ वाहतुकीचे केंद्र नव्हते, तर लोकशाहीचे खुले व्यासपीठ होते. इथे नागरिक एकत्र येत, प्रश्न मांडत, मतभेदांवर चर्चा करत आणि लोकहितासाठी संघर्षाची दिशा ठरवत असत.

एक काळ असा होता की पाणीटंचाई, रस्ते, वीज, स्वच्छता, अतिक्रमण, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी किंवा अन्यायाचा कोणताही विषय असला, तरी त्याविरोधातील पहिली ठिणगी चौकातूनच पडत असे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येऊन लोकआंदोलने उभी करत. अनेकदा प्रशासनाला जनभावनेपुढे झुकावे लागले आणि विविध प्रश्न मार्गी लागले.

स्वातंत्र्य चळवळीपासून ते स्वातंत्र्योत्तर काळातील नागरी प्रश्नांपर्यंत संगमनेरच्या चौकांनी लोकजागृतीचे काम केले. अन्यायाविरोधात उभे राहण्याची आणि लोकांना संघटित करण्याची ताकद या चौकांमध्ये होती. म्हणूनच संगमनेरची चौक संस्कृती ही शहराच्या सामाजिक इतिहासाचा अविभाज्य भाग मानली जाते.

मात्र आजचे चित्र चिंताजनक आहे. सामाजिक प्रश्नांवरील चर्चा कमी होत चालल्या आहेत. त्यांच्या जागी राजकीय गटबाजी, वैयक्तिक निष्ठा आणि परस्परांवरील आरोप-प्रत्यारोपांनी स्थान घेतले आहे. चौक हे लोकहिताच्या विचारमंथनाचे केंद्र न राहता अनेक ठिकाणी राजकीय शक्तिप्रदर्शनाचे अड्डे बनल्याची भावना नागरिक व्यक्त करतात.

याहूनही गंभीर बाब म्हणजे काही मंडळी विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेवून तरुणांच्या मनात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा समाजात होत आहे. विकासाच्या प्रश्नांवर एकत्र येण्याऐवजी समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती बळावत असतील, तर ती कोणत्याही शहरासाठी धोक्याची घंटा आहे.

पूर्वी लोकहितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा युवक आज मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियापुरता मर्यादित राहिल्याचे चित्र दिसते. त्यामुळे संघटित लोकआंदोलनांची ताकद कमी होत आहे. समाजातील प्रश्न मात्र तसेच आहेत.

आजही संगमनेरसमोर पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, अतिक्रमण, स्वच्छता, बेरोजगारी, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक सुविधांचे प्रश्न कायम आहेत. मात्र या प्रश्नांवर पक्ष, गट आणि मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची परंपरा कमकुवत होत चालली आहे.

लोकशाहीमध्ये मतभेद आवश्यक असतात पण मतभेदांचे मनभेदात रूपांतर झाले, तर समाजाचे नुकसान होते. चौकांनी पुन्हा एकदा लोकहित, विधायक चर्चा, सामाजिक सलोखा आणि जनआंदोलनांचे केंद्र बनण्याची गरज आज पूर्वीपेक्षा अधिक आहे.

संगमनेरचा इतिहास संघर्षाचा आहे, समाजाला एकत्र आणण्याचा आहे आणि अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा आहे. त्या परंपरेचे जतन करणे ही केवळ एका पिढीची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

शेवटी एकच प्रश्न…

संगमनेरचे चौक पुन्हा लोकशाहीचे व्यासपीठ बनणार, की राजकीय गटबाजी, सामाजिक दुरावा आणि परस्पर अविश्वासाच्या विळख्यात त्यांची ऐतिहासिक ओळख कायमची हरवणार ? 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!