उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनासाठी संगमनेरच्या बचत गटांची निवड

 प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात बचत गटांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. देशभरातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन भरवण्यात येत असून या वर्षी नोएडा येथे होणाऱ्या प्रदर्शनासाठी संगमनेरमधील दोन बचत गटाची निवड झाली असून हे अभिमानास्पद ठरले आहे.

संगमनेर पंचायत समितीच्या वतीने उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांची निर्मिती व सक्षमीकरणाचे काम चालू असून राष्ट्रीय पातळीवरील नोएडा येथील सरस आजीविका मेला २०२२ मध्ये आश्वी येथील माई महिला बचत गट व धांदरफळ येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई बचत गट यांची निवड झाली असून या बचत गटांचा सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना सुनंदा जोर्वेकर म्हणाल्या की, संगमनेर तालुक्यातील बचत गटांना देशपातळीवर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. हे संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. संगमनेर तालुक्यात बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरणाची मोठे काम होत असून या राष्ट्रीय पातळीवर निवडीमुळे इतरांसाठी नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे.

गटविकास अधिकारी अनिल लागणे म्हणाले की, संगमनेर तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून उमेद अंतर्गत तालुक्यातील महिला बचत गटांचे सबलीकरण व्हावे यासाठी महिला बचत गट कार्यरत असून या माध्यमातून बचत गटातून कर्ज घेऊन महिला एकत्रित व्यवसाय करतात. या करता शासनाची लागणारी सर्व मदत पंचायत समिती करत असते. या बचत गटांनी देशपातळीवर नेतृत्व करावे हे अत्यंत आनंददायी आहे. आश्वी येथील माई महिला बचत गट  कैरी, लिंबू, मिरची, अद्रक,आवळा असे चाळीस प्रकारचे मिठातील लोणचे निर्माण करत आहे. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई बचत गट खव्याचा पेढा निर्माण करत आहेत.

या निवडीबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, नवनाथ अरगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, प्रकल्प संचालक सुनील कुमार पठारे, सोमनाथ जगताप, मनीषा धीवर,अतुल चाठे यांनी अभिनंदन केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!