संगमनेर पोलीस गुन्हेगारांचे कैवारी ! पोलिसांचा धक्कादायक उद्योग !!..
अल्पवयीन पीडितेवर पोलीस ठाण्यातच दबाव
साखरपुडा मोडणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची खेळी…
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर शहर पोलिसांच्या अवैध उद्योगांनी आता कळस गाठला असून पोक्सो सारख्या गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्यासाठी पीडित मुलीलाच दबावात आणण्याचे काम भर पोलीस स्टेशनमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी केले असून खाकीचा गैरवापर करण्याचा प्रकार आता दिवसेंदिवस वाढू लागला आहे.

संगमनेर तालुक्यातील गुन्हेगारीने आता पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यातच कायद्याची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा साखरपुडा उधळून लावणाऱ्या नराधमाला वाचवण्यासाठी खुद्द संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी पीडितेवर दबाव टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट असून, पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्या पालकांनी ठरवलेला साखरपुडा आरोपीने मोडला. इतक्यावरच न थांबता आरोपीने दहा ते पंधरा जणांचा जमाव करून पीडितेच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांना मारहाण करत धिंगाणा घातला आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धक्कादायक प्रकार पोलीस ठाण्यात घडला. सीसीटीव्ही रूममध्ये पोलिसांचा ‘काळा’ कारनामा केल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी आमिषाला बळी पडून चक्क सीसीटीव्ही रूममध्ये पीडित मुलीला गाठले. कायद्यानुसार पीडितेसोबत महिला पोलीस किंवा नातेवाईक असणे बंधनकारक असताना, या कर्मचाऱ्यांनी तिच्या महिला नातेवाईकांना बाहेर काढले. त्यानंतर पीडितेला आरोपीचे फोटो आणि व्हिडिओ दाखवून “तू आरोपीशीच लग्न कर, त्याला वाचव” असे सांगत कोर्टातील जबाब बदलण्यासाठी तिला भावनिक ब्लॅकमेल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि इतर आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस त्यांना अटक करण्यास टाळाटाळ करत आहेत. उलट, हे प्रकरण ‘मिटवून’ घेण्यासाठी पोलिसांकडूनच मध्यस्थी केली जात असल्याचा आरोप झाला आहे. वडगावपानचा शाळकरी मुलीवरील ॲसिड हल्ला, मेंढवणमधील अत्याचाराच्या घटने पाठोपाठ अकोले आणि तमाशा कलावंत महिलांना मारहाण करण्याची घारगावची घटना ताजी असतानाच, पोलिसांच्या या संशयास्पद हस्तक्षेपामुळे तालुक्यातील महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या संतापजनक प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जर आरोपीला अटक आणि दोषी पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले नाही, तर संगमनेर शहरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

“पोलीस प्रशासनाचा वचक संपला असून आता पोलीसच गुन्हेगारांचे कैवारी बनत असतील, तर दाद मागायची कोणाकडे? या अन्यायाविरुद्ध आता संपूर्ण संगमनेर तालुका रस्त्यावर उतरेल!” अशी भावना संबंधितांनी व्यक्त केली आहे.
