संगमनेरहून धांदरफळला जाणारी 33 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी हटवावी….!

अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

संगमनेर येथील 132 केव्ही सबस्टेशन ते धांदरफळ पर्यंत धोकादायक व बेकायदेशीर पद्धतीने चालवलेली 33 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी हटवावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा या विद्युत वाहिनीमुळे धोक्यात आलेल्या गावातील ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

संगमनेर 132 केव्ही सबस्टेशन पासून ते धांदरफळ पर्यंत 33 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी ही धोकादायक, बेकायदेशीर व लोकांचा विरोध असून सुद्धा जबरदस्ती व हुकूमशाही पद्धतीने नागरिकांवर अन्याय-अत्याचार करून व पोलिसांच्या मदतीने नेण्यात आली आहे. संगमनेर शहर, गुंजाळवाडी, राजापूर, मंगळापूर, चिखली, धांदरफळ या गावातील नागरिक, कष्टकरी, शेतकरी बाधित आहेत.

एक ते दीड वर्षांपासून गावकरी या अन्यायाचा संघर्ष करत आहेत. सर्व बाधित गावातील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव घेऊन या धोकादायक कामाला विरोध केला असून शासन व प्रशासन आम्हास सहकार्य करत नाही. गावकऱ्यांना कळवण्यात आले होते की, ही 33 केव्ही लाइन संगमनेर सबस्टेशन पासून वाडापुर सबस्टेशन ला जोडली जाणार आहे. परंतु असे खोटे बोलून ती लाइन चिखली पासून धांदरफळ कडे खाजगी ठिकाणी वळवण्यात आली आहे असे निवेदनात म्हटले आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक च्या कार्यक्षेत्रात असलेल्या रोडचे मोजमाप न करताच या लाइन चे काम करण्यात आले आहे. MSRDC च्या कार्यक्षेत्रात असलेल्या रोड चे मोजमाप न करताच शेजारून या लाइन चे काम करण्यात आले आहे.

कोल्हार घोटी हा MSRDC च्या कार्यक्षेत्रात असलेला रोड आहे. त्या रोडच्या बाजूने संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणारी निळवंडे ते संगमनेर ही मोठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन झालेली आहे. या पाईपलाईन वर हे 33 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीचे पोल धोकादायक पद्धतीने उभे करण्यात आले आहेत.

निळवंडे ते संगमनेर पिण्याच्या पाईपलाईन वरील विद्युत पोल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी संगमनेर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांबरोबर दोनदा पत्रव्यवहार केलेला असून देखील त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले आहे. संगमनेर वीज वितरण कार्यालयासमोर गावकऱ्यांनी उपोषण केले मात्र कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. शेवटी चिखली या ठिकाणी मोठे आंदोलन केले त्यावेळी आम्हाला वीज वितरण च्या अभियंत्यांनी कार्यवाहीसाठी 15 दिवसांची मुदत मागितली.

आपण याकडे लक्ष द्यावे व ती धोकादायक व बेकायदेशीर 33 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी सुरक्षित ठिकाणी हलवावी. अन्यथा आम्ही सर्व बाधित गावकरी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा आपणांस देत आहोत असे वरील प्रमाणे निवेदनात म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!