माजी मंत्री बाळासाहेब थोरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर

सरकारने कोणताही फार्स न करता तातडीने मदत द्यावी 

संगमनेर प्रतिनिधी — 

संगमनेर तालुक्यातील पश्चिम भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिकांचे मोठे नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. याचबरोबर अनेक घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला याचबरोबर सरकारने तातडीने पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

निमज, धांदरफळ खुर्द, धांदरफळ बुद्रुक येथे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी थोरात यांनी केली. थोरात यांनी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली याचबरोबर पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.

थोरात म्हणाले की, कृषिप्रधान देशात शेतकरी मात्र कायम संकटात आहे. मोठ्या अडचणीवर मात करून तो पीक पिकवतो. अस्मानी संकटामुळे अनेकदा पिके वाया जातात. आलेल्या पिकांना भाव मिळत नाही. अवकाळी पावसाने हाता तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर जोरदार वादळामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. जनावरांचे गोठे पडले आहेत.

या भागात डाळिंब, कांदा, मका याचबरोबर उभे असलेले सर्व पिके वाया गेले असून या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सर्व शेतकरी व बाधित नागरिकांना त्वरित भरीव मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, निमज येथील विविध नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकरी महिलांना झालेल्या नुकसानीमुळे अश्रू आवरता आले नाही. बाळासाहेब थोरात यांनी धीर दिला असून सरकारने कोणतेही फार्स न करता तातडीने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!