संगमनेर पंचायत समितीत अधिकाऱ्यांची मनमानी…महिलेशी गैरवर्तन
दोन दिवस माझ्यासोबत फिरायला चल.. मानधन देतो, फिर्याद दाखल
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
बचत गटाच्या सीआरपी महिलेचे मानधन रोखून ठेवल्यामुळे पंचायत समितीमध्ये झालेल्या वादातून गंभीर प्रकरण उद्भवले असून अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांना संतप्त नागरिकांकडून मारहाण करण्यात आली. तर संबंधित महिलेने व्यवस्थापक कोकाटे यांच्याविरुद्ध विनयभंगाची फिर्याद दिली आहे. एकंदरीत या सर्व प्रकाराने संगमनेरचे राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.

सविस्तर हकीकत अशी की, बचत गटांच्या माध्यमातून तालुकाभर महिला सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या सीआरपी आणि बचत गट चालकांना विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय दबाव सहन करावा लागत असल्याचा आरोप होत असून विद्यमान आमदारांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, तसेच कार्यालयात अधिकाऱ्यांकडूनही चुकीची वागणूक दिली जाते, या विरोधात जाब विचारल्यास अधिकाऱ्यांकडून उर्मट आणि उद्धट वर्तन केले जाते अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.

शेडगाव येथील सीआरपी महिलेचे मानधन जाणीवपूर्वक रोखून धरण्यात आल्याच्या संदर्भाने ही घटना घडली असून या संदर्भात त्यांनी वारंवार पूर्ण मानधनाची मागणी केली. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. याउलट, अभियानाचा तालुका व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांनी सदर महिलेशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि लज्जास्पद शब्दांचाही वापर केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मानधन मिळत नसल्याने सदर महिलेने एका कार्यक्रमात भेटलेले सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात यांना आपली कैफियत सांगितली. त्यावर थोरात हे तात्काळ पंचायत समितीत जाऊन कोकाटे यांच्याशी बोलले. मात्र, तोडगा काढण्याऐवजी कोकाटे यांनी थोरात यांना शिवीगाळ केली आणि “तुला काय उपटायचे ते उपट” अशी भाषा वापरली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार रस्त्यावरच घडला. थोरात यांनी त्यांना भाषेला आवर घालण्यास सांगितले. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने रस्त्यावरचा दगड उचलून नानांवर उगारला असल्याचेही संबंधित कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

थोरात घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर हा प्रकार कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी थेट पंचायत समिती गाठली आणि त्या अधिकाऱ्याला जाब विचारला. तरीही अधिकाऱ्यांची मग्रुरी कमी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने संबंधित अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला.
या संदर्भात नंदलाल कोकाटे यांनी शरद नाना थोरात, अभिषेक थोरात, ऋषिकेश थोरात, अक्षय भालेराव, शिवमत भोकरे आणि इतर चार ते पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर संबंधित देखील नंदलाल कोकाटे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

संगमनेर पंचायत समितीबाबत तक्रारी वाढत आहेत. पंचायत समिती हा राजकारणाचा अड्डा बनला असून, सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करतात. ग्रामपंचायत, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि बचत गटांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जात असल्याचे गंभीर आरोप सर्वसामान्य ग्रामस्थ आणि नागरिकांमधून केले जात आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद नाना थोरात स्वतःहून पोलिसांत हजर झाले.
फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ, पोलिसांवर दबाव !
पंचायत समितीच्या माध्यमातून सातत्याने अंगणवाडी सेविका, आशा सेविका याचबरोबर सीआरपी यांना दबावात ठेवून विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबर राजकीय कार्यक्रमांसाठी त्यांचा वापर केला जात आहे. पंचायत समिती राजकारणाचा अड्डा झाला असल्याचे देखील बोलले जात आहे. सीआरपी महिला संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल करून घेण्यास खूप टाळाटाळ केली. विद्यमान सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर मोठा दबाव टाकला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
