आज ठरणार स्वीकृत नगरसेवक !
__ आमदार सत्यजित तांबे म्हणाले…
संगमनेर स्वीकृत नगरसेवक इच्छुकांची भाऊ गर्दी
संगमनेर शहराचा होणार कायापालट !
प्रशासनराज आणि कामचुकारपणा…

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेरच्या जनतेने सेवा समितीला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. अत्यंत मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनीच अगदी ताकत लावून काम केले. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती व्हावी यासाठी देखील अनेक जण इच्छुक आहेत. स्वीकृत नगरसेवक निवडताना विशेषतः राजकारणात प्रवेश करून काम करण्याची आणि सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींची नियुक्ती व्हावी अशी साधारण पद्धती आहे. मात्र आपल्याकडील इच्छुकांची संख्या जरा जास्तच असल्याने हा निर्णय घेणे थोडं कठीण झालं आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात राज्यात महापालिकेच्या प्रचार दौऱ्यावर आहेत ते संगमनेर मध्ये येणार आहेत. आज दिनांक 12 जानेवारी 2026 स्वीकृत नगरसेवक पदी कोणाला नियुक्त करायचे हे ठरविले जाण्याची शक्यता असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले.

पत्रकार दिनानिमित्त आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकारांशी संवादाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक रित्या गप्पा मारताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नूतन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे यादेखील उपस्थित होत्या. संगमनेर शहरातील पत्रकार देखील मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते.

नेहमीच्याच राजकीय गप्पांना बगल देत आमदार तांबे यांनी यावेळी पत्रकारांना त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित सुखदुःख आणि संघर्षाच्या बाबतीत मनमोकळेपणाने मनोगत व्यक्त करण्याचे आवाहन केले. त्यानुसार हा संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी पत्रकारांनी आपल्या आयुष्यातला संघर्ष, आलेले कटू अनुभव, सुरू असलेली जीवनातली लढाई आणि पत्रकारिता यावर मनमोकळेपणाने मनोगत व्यक्त केले. त्यामुळे एकमेकाचा पुन्हा जवळून अतिशय चांगला परिचय झाला. या संवाद कार्यक्रमामुळे पत्रकारांच्या विविध समस्या आणि संघर्ष समोर आला.

कार्यक्रमाची सांगता होताना स्वीकृत नगरसेवक पदी एखाद्या पत्रकाराला संधी मिळावी अशी अपेक्षा पत्रकारांनी केली. त्यावेळी आमदार तांबे यांनी वरील परिस्थितीची माहिती दिली. स्वीकृत नगरसेवक पदी येण्यास अनेक जण इच्छुक असल्याने आणि निवडणूक काळात अनेकांनी प्रामाणिकपणे आणि चांगले काम केल्याने सदस्य पदी निवडण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे, अशी स्थिती आता सध्या सेवा समिती समोर असून लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सेवा समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी आमदार सत्यजित तांबे याबाबत निर्णय घेऊन स्वीकृत सदस्यांची निवड करतील अशी अपेक्षा इच्छुकांकडून व्यक्त होत आहे.

संगमनेर शहराचा होणार कायापालट !
बोलता बोलता आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर शहराच्या 2.0 व्हिजन मध्ये शहराचा मोठ्या प्रमाणावर कायापालट करणार असल्याचे सांगितले. जागतिक दर्जाचे तज्ज्ञ बोलावून शहराचा व्यवस्थित आराखडा केला जाणार आहे. तसेच पारंपारिक पद्धतीने देखील नगरपालिकेची विकासाची कामे सुरू राहणार आहेत. दोन ट्रॅक वर काम चालणार असून एक पारंपरिक पद्धतीने चालणारे विकासाचे काम आणि दुसरे नवीन आणि अद्यावत योजनांचे काम शहरांमध्ये चालणार आहे. नगरपालिकेचे प्रशासन देखील नियोजनबद्ध रीतीने काम करील आणि संगमनेरकरांची सेवा केली जाईल असे मत देखील आमदार सत्यजित तांबे यांनी मांडले.

प्रशासनराज आणि कामचुकारपणा…
नगरपालिकांवर गेल्या चार वर्षांपासून प्रशासन राज होते. यावेळी नागरिकांनी अनेक समस्यांचा सामना केला आहे. प्रशासन काळात कामचुकारपणा देखील झाला. वेळ काढू पण होतो. या सर्व बाबी समोर आल्या आहेत. नगरपालिकेच्या नोटीस बोर्डवर लावलेली दीड वर्षापूर्वीची नोटीस / पत्रक सुद्धा कर्मचाऱ्यांनी हटवली नाही. दीड वर्ष नोटीस तिथेच. कामचुकारपणाचा हा एक उत्तम नमुना आहे. प्रशासनावर कोणाचाही वचक नव्हता, अशीही चर्चा यावेळी पुढे आली. आता मात्र प्रशासन कर्मचारी नियोजनबद्ध पद्धतीने काम करतील. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून देखील या नियोजनात मदत होणार आहे. असे देखील आमदार सत्यजित तांबे यांनी अनौपचारिक रित्या बोलताना सांगितले.
