ती सध्या काय करते….

राजकारणाचं वारं अंगात आलं… आता जनता गेली खड्ड्यात… समाजसेवेचीही ऐशी तैशी..

 

आटपाट नगरीत नेहमीच विविध घटना घडत असतात. त्यात काही विनोदही घडतात. आटपाट नगरीच्या निवडणुका होतात. राजकारण चांगलंच तापलेलं असतं. सध्या आटपाट नगरीत ‘नव्या जुन्यांचा’ धुमाकूळ सुरू आहे. आटपाट नगरीच्या परिषदेची निवडणूक नुकतीच पार पडली. अनेक जनसेवक यात निवडून आले. पालिकेच्या अध्यक्षपदाची हवा डोक्यात घुसलेली आणि राजकारणाचा वारा अंगात आलेली एक उमेदवार मोठा पराभव झाल्यानंतर मात्र जनता गेली खड्ड्यात, समाजसेवेचे काही घेणं देणं नाही, महिलांचे तर प्रश्न विचारूच नका, राजकारणाची आणि निवडणुकीची ऐशी तैशी करत पराभवानंतर जागेवर आली…. आता आपलं घरदार, आपले कामधंदे, आणि आपला पैसा बरा अशी भूमिका घेत गायब झाली आहे. मात्र “ती सध्या काय करते” असा प्रश्न आटपाट नगरीच्या रयतला पडला आहे.

आटपाट नगरीतील परिषदेच्या निवडणुकीत अनेक भूछत्र निवडणुकीत अचानक उगवले होते. अध्यक्ष होण्याची अशीच हवा डोक्यात गेली आणि निवडणुकीचा वारं अंगात आल्याने केलेल्या ‘उपकारांची कृतघ्न फेड’ करण्यासाठी परिषदेत अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या माजी सुभेदारांच्या विरोधातच निवडणुकीचे दंड थोपटण्यात आले. सहानुभूती आणि धार्मिक हवा याचा आपल्याला फायदा होईल व त्या हवेवर स्वार होऊन आपण अध्यक्ष होऊ असा बुडबुडा मात्र निकालानंतर अनेकांचा फुटला.

निवडणुकीत आटपाट नगरीच्या विकासाच्या अनेक बाता मारण्यात आल्या. विविध मूलभूत समस्या, महिलांच्या समस्या, रयतेच्या समस्या, रस्ते वीज पाणी या सर्वच प्रश्नांवर ‘भाषणबाजी’ करण्यात आली. अनेक ‘बोलबच्चन’ करण्यात आले. पूर्वेच्या सुभेदारांकडून आलेले ‘रेडी स्क्रिप्ट’ वाचून दाखवण्यात आले. या सगळ्यात ‘ती’ देखील पुढे होती. निवडणूक निकालानंतर मात्र दणकून आपटल्यावर अचानकपणे गायब होण्याचा प्रताप करण्यात आला असून अंगात आलेलं वारं गेलं असलं तरी रयतेला मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. आता ज्यांनी आपल्याला उभं केलं आणि राजकारणाची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, त्यांच ते पाहून घेतील अशा भूमिकेत पराभूत उमेदवार असल्याचे चित्र सध्या आटपाट नगरीत दिसून येत आहे.

आटपाट नगरीतील सुसंस्कृत राजकारण हे तात्पुरतं नसून त्यासाठी समाजसेवेचा पाया मजबूत असावा लागतो. सुभेदारांना शह देण्यासाठी जनसेवा, आंदोलन चळवळी उभ्या कराव्या लागतात. स्वतः संघर्ष करावा लागतो. फक्त निवडणुकात मिरवण्यापुरतं आटपाट नगरीचं राजकारण तेवढं सोप्प नाही. दुसऱ्याच्या झेंड्यावर तर अजिबात कायमस्वरूपी यश मिळणार नाही. याची जाणीव नसल्याने निकालानंतर पानिपत झाल्यावर अनेक जण भानावर आले आहेत.

आटपाट नगरीत सध्या निवडणुकीच्या राजकारणात नव्या जुन्यांनी धुमाकूळ घातला असला तरी दोन सभेदारांच्या लढाईत नव्याने आपला अ-संस्कृतपणा चव्हाट्यावर आणू नये. भाषा आणि संयम राजकारणात महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. वाणीचा वाईट वापर केल्यावर त्याचे परिणाम कसे होतात हे समोर आले आहे. बाहेरच्या सुभेदारांच्या नादी लागून आटपाट नगरीचे कायमचे नुकसान करण्यात आपला वाटा असू नये याचा विचार नव्यांनी करायला हवा. आटपाट नगरी आपलीच आहे. त्या नगरीचा विकास, रयतेचा विकास कसा होईल याचाच विचार करायला हवा. नाहीतर डोक्यात गेलेली हवा रयत अशी काढून घेत असते आणि उरली सुरली हवा कधी काढून घेईल हे सांगता येत नाही.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!