दिल्लीकर चाखणार अहिल्यानगरचा हुरडा !
नेवाशाच्या सतीश भांगे यांची महाराष्ट्र सदनासाठी निवड ; जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर
महाराष्ट्राची अस्सल गावरान चव आता देशाच्या राजधानीत पोहोचली आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सुरू असलेल्या ‘संक्रांत मेळाव्यात’ अहिल्यानगर जिल्ह्याचा हुरडा दिल्लीकरांच्या पसंतीस उतरणार आहे. नेवासा तालुक्यातील ‘गुरुकृपा हुरडा पार्टी’ची या महोत्सवासाठी राज्यभरातून निवड झाली असून, ही जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची बाब ठरली आहे.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ९ ते ११ जानेवारी २०२६ या काळात मकर संक्रांतीनिमित्त विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती मांडण्यासाठी राज्यभरातून अनेक शेतकरी गट आणि संस्थांच्या अर्जांची छाननी झाली. त्यातून नेवाशाचे सतीश भांगे यांच्या ‘गुरुकृपा हुरडा पार्टी’ची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.

या मेळाव्याचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र सदनच्या आयुक्त आर. विमला यांच्या उपस्थितीत झाले. भरत जाधव यांनीही या गावरान उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
या महोत्सवात केवळ हुरडाच नाही, तर गरमागरम मक्याची कणसं, अस्सल गूळ, काकवी, वांग्याचे भरीत, उसाचा रस आणि ताजा भाजीपाला दिल्लीकरांना मिळणार आहे. विशेष म्हणजे ‘शेत ते थेट ताट’ (Farm to Plate) या संकल्पनेमुळे दिल्लीतील खवय्यांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातील ताजे पदार्थ चाखता येणार आहेत.
कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ व हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे, असे मत बोराळे यांनी व्यक्त केले.
