चायनीज नायलॉन मांजाचा वापर टाळा — नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे संगमनेरकरांना आवाहन
संगमनेर | प्रतिनिधी
मकर संक्रांतीचा सण येत आहे. या पार्श्वभूमीवर मकर संक्रांत आनंदात व सुरक्षिततेने साजरी करण्यासाठी पतंग उत्सव साजरा करताना चायनीज मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा असे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांनी केले आहे.

चायनीज मांजा हा काच धातू व रासायनिक घटकांनी बनवलेला असल्याने तो मानवी जीवितासह पक्षी, पाळीव प्राणी व पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत आहे. दरवर्षी या मांजामुळे गंभीर अपघात घडत असून अनेक निष्पाप पक्ष्यांचे प्राणही जात असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाने चायनीज मांजावर संपूर्ण बंदी घातलेली आहे. तरीही त्याची विक्री, साठवणूक किंवा वापर करताना आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही डॉ.मैथिली तांबे यांनी दिला असून नगरपालिकेच्या पथकांसह पोलीस प्रशासन सतर्क राहणार आहे.

नागरिकांनी पर्यावरणपूरक, सुती व सुरक्षित मांजा वापरून पतंग उडवावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी पतंग उडवताना इतर नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. मकर संक्रांती हा सण आनंद आणि सुरक्षिततेचा संदेश देणारा असल्याने कोणाच्याही जीविताला धोका न पोहोचवता सण साजरा करावा असे आवाहन देखील डॉ. तांबे यांनी सांगितले.

उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर यांनी नायलॉन मांजा संदर्भात सन 2021 पासून नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातली आहे. परंतू नायलॉन मांजाचा सर्रास वापर अजूनही सुरूच आहे. दरवर्षी अशा नायलॉन मांजामुळे अनेक लोक जखमी होतात किंवा काहींचा मृत्यू होतो. त्यामुळे मी नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांना तसेच विक्रेत्यांना नम्रपणे आवाहन करते की आपणही चायनीज नायलॉन मांजाची विक्री करू नये, जेणेकरून इतरांना तो वापरता येणार नाही. तसेच नागरिकांना, तरुणांना देखील आवाहन करते की, आपणही चायनीज मांजा खरेदी करू नये, व त्याचा वापर देखील करू नये.
– डॉ. मैथिली तांबे
