राजूरच्या सिद्धेशचे स्वप्न पूर्ण होणार !
— पालकमंत्र्यांनी स्वीकारली शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी होती… बक्षीस वितरणासाठी पुकारले गेलेले नाव होते ‘सिद्धेश हंगेकर’. विजेत्याचे नाव पुकारताच एक विद्यार्थी व्हिलचेअरवरून पुढे आला. हे पाहताच खुर्चीवर बसलेले राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट व्यासपीठावरून खाली धाव घेतली. मंत्र्यांना आपल्याजवळ आलेले पाहून सिद्धेश भारावून गेला. विखे पाटलांनी केवळ त्याचे कौतुकच केले नाही, तर त्याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत उपस्थितांची मने जिंकली.

जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात जिल्हा परिषदेच्या गणित – विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हा हृदयस्पर्शी प्रसंग घडला.

राजूर (ता. अकोले) येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाचा सिद्धेश संतोष हंगेकर हा विद्यार्थी दिव्यांग आहे. मात्र, शारीरिक व्यंगावर मात करत त्याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दिली आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तो दोनवेळा विजेता ठरला आहे. त्याची ही जिद्द व हुशारी पाहून पालकमंत्री प्रभावित झाले.
व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर विखे पाटलांनी सिद्धेशच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यांनी अत्यंत आपुलकीने त्याची व त्याच्या घरच्या परिस्थितीची विचारपूस केली. घरची परिस्थिती साधारण असूनही सिद्धेशने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिद्धेशच्या डोळ्यातील शिक्षणाची आस पाहून श्री. विखे पाटील यांनी तिथेच एक मोठा निर्णय जाहीर केला. सिद्धेशच्या पुढील शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था’ त्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलेल, असा शब्द त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, विनायकराव देशमुख यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी या भावूक प्रसंगाचे साक्षीदार होते.
