सापडलेले सोने मालकिणीला परत; आश्वी खुर्दच्या दोघींनी जपला प्रामाणिकपणा
बक्षिसाची रक्कमही मंदिर जिर्णोद्धारासाठी अर्पण; श्रावणी जगताप व उज्वला भंडारे यांचे सर्वत्र कौतुक
आश्वी | प्रतिनिधी
आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचे दर्शन दुर्मिळ होत चालले असताना, आश्वी खुर्द येथील दोन महिलांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. महांकाळेश्वर मंदिर परिसरात सापडलेली सुमारे ३० हजार रुपये किमतीची सोन्याची वस्तू तिच्या मूळ मालकिणीपर्यंत सुखरूप पोहोचवून प्रामाणिकपणाचा नवा अध्याय लिहिला गेला आहे.

२७ डिसेंबर रोजी आश्वी खुर्द येथील भाजीपाला व्यावसायिक मनोज भंडारे यांच्या पत्नी उज्वला भंडारे (कहार) या महांकाळेश्वर मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. तिथे त्यांना मंदिराच्या कोपऱ्यात एक सोन्याची मौल्यवान वस्तू सापडली. त्यांनी ही माहिती पतीला दिली. त्यानंतर पत्रकार संजय गायकवाड यांच्या मदतीने ‘पेशवाई गणेश मंदिर’ या व्हॉट्सॲप ग्रुपवर “योग्य ओळख पटवून सोन्याची वस्तू घेऊन जावे” असा संदेश प्रसारित करण्यात आला.
योगायोगाने, इयत्ता १२ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी श्रावणी महेश जगताप हिने हा संदेश वाचला आणि तिनेही संपर्क साधला. श्रावणीलाही त्याच सोन्याचा काही भाग सापडला होता.

चौकशीअंती सदर सोन्याची वस्तू कांताबाई दत्तात्रय मांढरे यांची असल्याचे निष्पन्न झाले. आपली हरवलेली वस्तू सुखरूप मिळाल्याचे पाहून मांढरे कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
कृतज्ञतेपोटी मांढरे परिवाराने श्रावणी जगताप आणि उज्वला भंडारे यांना प्रत्येकी २१०० रुपयांचे बक्षीस देऊ केले. मात्र, या दोघींनीही ते बक्षीस स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला.
श्रावणीने ती रक्कम आणि उज्वला भंडारे यांच्या वाट्याची रक्कमही मांढरे परिवाराने प्रभु श्रीराम – प्रभु श्रीदत्त – प.पु. बाल ब्रह्मचारी शिवभक्त पुंजाआई माता संयुक्त मंदिर जिर्णोद्धारासाठी देणगी स्वरूपात अर्पण केली. एकीकडे प्रामाणिकपणा आणि दुसरीकडे देवभक्ती व सामाजिक जाणीव पाहून संपूर्ण आश्वी परिसरात या दोघींचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोठे कौतुक होत आहे.
“आजच्या काळात प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे या घटनेने सिद्ध केले आहे. केवळ वस्तू परत करणेच नव्हे, तर बक्षिसाची रक्कमही मंदिरासाठी देणे ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे.”
अलका बापुसाहेब गायकवाड, सरपंच आश्वी खुर्द
