वाळू तस्करी साठी मुळा नदी पात्रात तस्करांनी तयार केला स्वतःचा खुष्कीचा मार्ग..!
अनेक दिवसांनी महसूल विभागाला आली जाग !!

विकास – विकास आणि विकासाचे पर्व – नुसताच जागरण गोंधळ
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यात सरावलेले वाळू तस्कर तस्करी साठी कोणती शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. कारण त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिला नसल्याने. ‘हम करेसो’ या उक्तीप्रमाणे त्यांचा हा वाळू तस्करी चा गोरख धंदा जोरात सुरू आहे.
संगमनेर तालुक्यातून पुणे जिल्ह्या कडे वाळू तस्करी करताना काही ठिकाणी अडचणी येत असल्याने पठार भागातील वाळूतस्करांनी शक्कल लढवत मुळा नदीपात्रातील पाण्यात मातीचा बंधारा घालून रस्ता तयार केला. संगमनेर तालुक्यातील खैरदरा या परिसरातून हा मातीचा भराव घालून तयार केलेला रस्ता पारनेर तालुक्यातील या पवळदरा परिसरात निघतो.

या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करून वाळूचे मोठे डंपर पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेले जातात. या बेकायदेशीर वाळू वाहतुकीला पठार भागातील जांबुत गावच्या ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. या विरोधामुळे वाळू तस्करांना चोरीची वाळू सहजासहजी पुणे जिल्ह्यात नेता येत नव्हती. त्यामुळे वाळूतस्करांनी शक्कल लढवून, पैसा खर्च करून, यंत्रसामुग्री वापरून संगमनेर तालुक्यातून पारनेर तालुक्यात वाळू वाहतुकीसाठी मुळा नदीतच बंधारा घालून हा खुष्कीचा मार्ग तयार केला होता. या मार्गावरून वाळू वाहतूक करून पारनेर तालुक्यात नेऊन छोट्या छोट्या खेड्यांमधून ती थेट पुणे जिल्हात नेण्यात येत होती.

पारनेर तालुक्यातून ही वाळू सहीसलामत, कुठलीही चौकशी न होता पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पोहोचत होती. याचा अर्थ असा आहे की, ही साखळी किती मोठी आहे हे यावरून दिसून येते.
वाळूचा बंधारा मार्ग काही एका तासात होणारे काम नव्हे. नदीपात्रात पाणी असताना बांध घालून रस्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर माती, रॅबिट आणि तत्सम प्रकारच्या गोष्टी लागल्या असणार आहेत. त्यासाठी यंत्रसामुग्री लागली असणार आहे. त्यासाठी खूप वेळ देखील लागला असणार आहे.

मग एवढा मोठा रस्ता तयार करेपर्यंत संगमनेरचे महान महसूल खाते काय करत होते ? हा खरा संशोधनाचा विषय आहे. तलाठी, मंडळ अधिकारी, तथाकथित भरारी पथके कुठे गायब झाले होते हे देखील समजण्या पलीकडे आहे.
वृत्तपत्रातून आणि सोशल मीडियातून या खुष्कीच्या मार्गाचे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक दिवसांनी संगमनेर चा महसूल विभाग खडबडून जागा झाला. किंवा जागा झाल्याचे नाटक केले असावे. आणि त्यांनी बुलडोजर च्या साह्याने वाळू तस्करांचा मार्ग तोडून टाकला.

थेट नदीपात्रात रस्ता करणे हे धाडस म्हणजे अतीच म्हणावे लागेल. वाळूतस्करांनी हे काही सहजासहजी केलेले नाही. यासाठी त्यांना प्रशासनातील यंत्रणेचा छुपा पाठिंबा होता का ? किंव महसूल मधील कोणी मोठा अधिकारी त्यांच्या पाठीशी आहे का ? किंवा जिल्हा पातळीवरील प्रशासनाकडून त्यांना काही सपोर्ट मिळतोय का ? राजकीय पुढाऱ्यांचा यात काही हस्तक्षेप आहे काय ? संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील बडे बडे नेते यात सहभागी आहेत काय ? हे सर्व प्रश्न उपस्थित होत असले तरी ते अनुत्तरीतच आहेत.

यातली ‘खरी गोम’ महसूल खात्याच्या अधिकार्यांनाच माहीत असावी.
एकंदरीत पाहता वाळू तस्करी साठी वाळू तस्कर काहीही करायला तयार आहेत आणि त्यातून आर्थिक मलिदा मिळवण्यासाठी प्रशासन आणि राजकीय पुढारी देखील काहीही करायला तयार आहेत. हेच यावरून दिसून येते.

संगमनेरची तथाकथित सुप्रसिद्ध गांधीगिरी करणारी ‘चौकडी गॅंग’ देखील वाळू तस्करी बाबतीत सोयीस्कररीत्या मौन बाळगून असते. ना सरकारला याचे काही घेणे देणे आहे. ना प्रशासनाला याचे काही घेणे देणे आहे. ना मंत्र्यांना याचे काही सोयरसुतक आहे. सगळीकडे आलबेल आहे.
विकासाच्या गप्पा सुरू आहेत. विकास – विकास – विकास आणि विकासाचे पर्व एवढा एकच ‘जागरण गोंधळ’ घालण्याचे काम मंडळींकडून सुरू आहे.
