प्रवरा नदीत पाणी असतानाही वाळू तस्करी जोरात !

ट्रॅक्टरला फनी लावून काढली जाते वाळू !!

दिवसाढवळ्या वाळू तस्करांचा हैदोस

महसूलच्या अधिकाऱ्यांची ‘आंधळी कोशिंबीर’ जोरात

 

प्रतिनिधी —

 

संगमनेरातील वाळू तस्करांचा हैदोस संपणार तरी कधी असा सवाल उपस्थित झाला असतानाच वाळूतस्करांची मुजोरी आता एवढी वाढली आहे की दिवसाढवळ्या प्रवरा नदीच्या पात्राला पाणी असताना देखील सर्रासपणे वाळू उपसा करण्यात येतो. संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावाच्या शेजारी असणाऱ्या निंबाळे गावच्या शिवारात थेट ट्रॅक्टरला फनी लावून पाण्यातून ओढून ट्रॅक्टरद्वारे भरून वाळू तस्करी सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

वाळू तस्करी साठी प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुका सर्वश्रुत आहे. राज्यभरात अवैध कत्तलखाण्यांनी संगमनेरची इज्जत वेशीला टांगलेली असतानाच वाळू तस्कर ही कुठे कमी नाहीत असे या तस्करांकडून दाखवण्यात येत आहे.

संगमनेरात प्रशासन आणि पोलिस हे फक्त नावालाच उरले आहेत. कुठल्याही प्रकारची जबरदस्त कारवाई या घटकांकडून होताना दिसत नाही. संपूर्ण समाजाचा शासन आणि पोलिसांवर विश्वास असतो त्यांना आता या दोन्ही खात्याकडून कुठलीही अपेक्षा राहिलेली नाही.

संगमनेरचा महसूल विभाग नेमके काय काम करतो हा संशोधनाचा विषय आहे. वरून येणारे आदेश पाळणे व त्या प्रमाणे छोटे-मोठे इव्हेंट सादर करणे एवढा एकच उद्योग हा नगर जिल्ह्यातील प्रशासनाचा झालेला आहे.

दर आठवड्याला काहीतरी इव्हेंट साजरा करायचा, त्याचे फोटो काढायचे आणि तो प्रसिद्धीला द्यायचा असाच प्रकार अगदी जिल्हा कार्यालयापासून ते तालुक्या पर्यंत चालू असल्याचे दिसून येत आहे. मात्र बेकायदेशीर कामांवर कारवाई करणे, अवैध प्रकार होऊ न देणे ही जबाबदारी असलेले हे महसूल खाते याबाबत अजगरासारखे सुस्त पडून आहे.

संगमनेर तालुक्याच्या वाळू तस्करी बाबत संगमनेर महसूल खात्याकडून नागरिकांना कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. या वाळूतस्करीवर कारवाई करण्याच्या बाबतीत संगमनेरचे महसूल अधिकारी ‘आंधळी कोशिंबीर’ सारखा खेळ खेळत असल्याचे बोलले जाते. स्वतःच्याच हाताने स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधायची, डोळे बंद करायचे आणि समोरच्याला सापडायला निघायचे असा हा प्रकार आहे असे बोलले जाते.

 

संगमनेर तालुक्यात गौण खनिज तस्करीची विविध प्रकरणे चव्हाट्यावर आलेली असतानाच, वाळू तस्करी ने सर्वत्र घातलेला हैदोस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आज पाणी असताना देखील दिवसाढवळ्या वाळू तस्करी सुरू असल्याचे पाहण्यास मिळाले. या भागात महसूल विभागाचा तलाठी फिरकत नाही, मंडळ अधिकारी फिरकत नाही, तहसीलदार फिरकत नाही आणि प्रांत अधिकारी देखील फिरकत नाहीत. कारवाई करू एवढा एकच परवलीचा शब्द ऐकण्यास मिळतो.

महसूलमंत्र्यांच्या हा तालुका, मतदार संघ असला तरी वाळू तस्करीला राजाश्रय मिळाला असल्याचे हे चित्र असल्याचे आता बोलले जात आहे. वाळू तस्करीतून संगमनेर तालुक्यातील सर्वच साहेबांच्या समर्थकांचा छोट्या-मोठ्या पुढाऱ्यांचा पॉकेट खर्च निघतो आणि या खर्चातून साहेबांचा देखील उदोउदो होतो अशी चर्चा पर्यावरणप्रेमी, त्रस्त नागरिकांकडून ऐकण्यास मिळते.

 

संगमनेरच्या वाळू तस्करीवर अगदी महसूलमंत्र्यांना पासून ते थेट नगराध्यक्ष पर्यंत सगळ्यांनीच मौन धरलेले आहे. एकीकडे वृक्षसंवर्धन, सुंदर व स्वच्छ संगमनेर च्या गप्पा मारत असताना, दंडकारण्य अभियान राबवत असताना पर्यावरणाचे महत्त्व समजून देत असताना दुसरीकडे नगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या प्रवरा नदीचे लचके तोडत वाळू तस्करी पर्यावरणाचे वाटोळे करीत आहे. संगमनेरची अमृतवाहिनी मात्र पूर्णपणे ओसाड करण्याचे काम चालू आहे. याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे.

संगमनेर येथील मुळा, प्रवरा वाळू तस्करीवर महसूलमंत्री गप्प का ? तक्रारी करून काहीच होत नाही. महसूलमंत्रीपद वाळू तस्करांसाठी वरदान आणि सामान्य संगमनेरकरांसाठी एक शापच ठरत आहे, असेच म्हणावे लागेल. नदीला पाणी असताना प्रवरा नदीपात्रातील निंबाळे, जोर्वे भागात दिवसा वाळू तस्करी महसूलमंत्री यांच्या आशीर्वादाने व महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या आर्थिक सहकार्याने चालूच आहे. अजून किती दिवस पर्यावरणाची हानी करणार.

अमोल खताळ, सामाजिक कार्यकर्ते, संगमनेर.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!