गुन्हेगारीचे केंद्र संगमनेर ! 

पोलिसांचा वचक राहिला नाही !!

विद्यार्थिनीची छेडछाड –

दिवसाढवळ्या चाकू, सुऱ्या – गुंडगिरी

 

प्रतिनिधी —

संपूर्ण नगर जिल्ह्यात गुन्हेगारीचे केंद्र म्हणून संगमनेर शहर व तालुका समोर आले आहे. शहरात आणि तालुक्यात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटनांनी संगमनेरात पोलिसांचा कुठलाच वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. पोलिस फक्त नावापुरतेच उरले आहेत काय अशी शंका उत्पन्न होऊ लागली आहे.

अवैध धंदे तर संगमनेरच्या पाचवीलाच पुजलेले असताना आता ग्रामीण भागात रस्ते लूट, घरफोड्या, चोऱ्या, हाणामाऱ्या याचे प्रमाण वाढलेले आहे. शहरात सुद्धा चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मोटरसायकल चोरी तर दररोज रतीब घातल्याप्रमाणे सुरू आहे.

 

यावर कळस म्हणून आता शहरात गुंडांची मिजास एवढी वाढली आहे की, एका विद्यार्थिनीची छेड छाड करुन तिला वाचविण्यासाठी येणाऱ्या नातेवाईक विद्यार्थ्यांवर देखील चाकूने हल्ला करण्यापर्यंत गुंडगिरीची मजल गेली आहे. पोलिसांचा कुठलाही धाक राहिला नसल्याने संगमनेरात चाकूर सुऱ्या दिवसाढवळ्या निघू लागले आहेत. संस्कारित आणि सुसंस्कृत संगमनेर आता गुन्हेगारीचे केंद्र बनू लागले आहे.

संगमनेर शहर पोलीस स्टेशनचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. विविध गंभीर आरोप देखील संगमनेर शहर पोलिस ठाण्यावर होत आहेत. या आरोपाला मधून  पोलीस निरीक्षक सुद्धा सुटलेले नाहीत. तक्रार करायला येणाऱ्या लोकांवर दादागिरी केली जाते. तुमच्यावर गुन्हा दाखल करू अशी भीती दाखवली जाते. असे देखील आरोप संगमनेर शहर पोलिसांवर झाले आहेत.

यासाठी संगमनेर शहर पोलिसांचे समाजातील वागणे कारणीभूत असल्याचे बोलले जाते. समाज आणि पोलिसांचा कुठलाही समन्वय राहिलेला नाही. समाजातील महत्त्वाचे घटक हे पोलिसांपासून दुरावलेले दिसतात. पोलिसांच्या शांतता समितीच्या बैठका ह्या गुपचुप आणि  पोलिसांना समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये होत असल्याने नेमक्या सूचना, घटना पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत.

वस्तुस्थिती पोलिसांना समजत नाही. गुप्तवार्ता विभाग कोणत्या वार्ता गोळा करण्यात गुंतला आहे हे त्यांचे त्यांनाच माहीत. त्यामुळे शहरात विविध घटना घडत आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये संगमनेर शहर पोलिस स्टेशन मागेच आहे. डिटेक्शन ब्रांच नेमकी आहे की नाही किंवा ती काय करते हे पोलिसनाच माहित आहे. असा सर्व प्रकार संगमनेर शहर पोलिस ठाण्यात याबाबत पडत आहे.

शहर पोलीस ठाणेच नव्हे तर घारगाव आणि संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या बाबत देखील असेच बोलले जात आहे. महत्त्वाच्या गुन्ह्यांची माहिती लपवणे, गुन्हे दाखल करण्यास वेळ लावणे, माध्यमा पर्यंत, पत्रकारांपर्यंत माहिती पोहोचू न देणे. यासाठीच पोलिसांचा आटापिटा चाललेला असतो. फक्त पोलिसांना आयते काही सापडले तर त्याचे फोटो काढायचे आणि प्रसिद्ध करून घ्यायची, पण घडलेल्या गुन्ह्यांची माहिती समाजापर्यंत जाऊ द्यायची नाही. असा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!