बंडखोर अवलीया चंदू पवार !

चंद्रकांत लहुजी पवार आणि माझी पन्नास वर्षांची मैत्री त्याच्या निर्वाणामुळे खंडित झाली. चंदू जेंव्हा पंचवीशीतला तरुण होता तेंव्हा तो आग्या मोहोळ होता. एखाद्या ठिकाणी अन्याय झाला की, पेटून उठायचा, प्रश्नाला भिडायचा, सगळे जग अंगावर घ्यायचा त्यामुळे बऱ्याचदा अडचणीत यायचा पण तो परिणामांची पर्वा करीत नसायचा. तो जेव्हा अकोल्यात आणि नगरला होता तेंव्हा उपेक्षित व्यासपीठाच्या माध्यमातून चळवळीत सक्रीय होता.
तो बुद्धिप्रामाण्यवादी होता, त्याने विषमतेचे समर्थन करणाऱ्या रूढी, परंपरा, कर्मकांड यांना विरोध केला. अंधश्रद्धेला त्याचा कडवा विरोध होता.

तो स्पष्टवक्ता होता, निर्भीड होता, अभ्यासू होता, विद्रोही होता,चळवळ्या होता,कलाकार होता, नाटककार होता, हाडाचा शिक्षक होता.चित्रकार होता, उत्तम वक्ता होता, कुशल संघटक होता,विद्वान होता, नेता होता, दिलदार मित्र होता मुख्य म्हणजे तो एक चांगला माणूस होता.
त्याला खूप चांगली सौंदर्य दृष्टी होती, तो ज्या कार्यक्रमाचे आयोजन करित असे त्याची मांडणी, सजावट फारच सुंदर आणि हटके असे.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या चळवळीत तो अग्रभागी होता. आम्ही संगमनेरला त्यासाठी अनेक आंदोलनं केली. पोलिसांनी आम्हाला कितीतरी वेळा अटक केली पण कोठडीत टाकले नव्हते. चंदूला याचा खूप राग यायचा तो म्हणायचा मला अधिक आक्रमक व्हायचे आहे. सरकार ठिकाण्यावर येईल असे काही तरी करायचे. मी म्हणायचो आपण बाबासाहेबांच्या नावासाठी लढतोय तेंव्हा हा लढा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गानेच लढला पाहिजे. त्याला हे पटले, तो निदर्शने करण्यासाठी औरंगाबादला गेला. तेथे त्याला अटक झाली, त्याची रवानगी तुरुंगात झाली. तेंव्हा तो सरकारी नोकरीत होता. २४ तासापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिल्यास नोकरीतून निलंबित केले जाते पण चंदूने त्याची परवा केली नाही.

चंदू नाटकवेडा होता. अभिनय, दिग्दर्शन आणि नाट्य लेखन,नेपथ्य यात त्याचा हातखंडा होता. रात्री तासोनतास नाटकाच्या रंगीत तालीम करणे, नवनवे कलाकार शोधणे, त्यांना अभिनयाचे पैलू पाडणे, राज्यपातळीवर विविध नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धेत भाग घेणे याचा त्याला ध्यास लागलेला होता. नटसम्राट नाटकाचे दिग्दर्शन आणि त्यातील आप्पासाहेब बेलवणकर या नटसम्राटाची भूमिका यांमुळे चंदूचे नाव राज्यभर गाजले होते. त्याने दिग्दर्शित केलेल्या वड या एकांकीकेस जिल्हा व राज्यपातळीवर बक्षिसे मिळाली.
चंदू आणि मी दोघांनीही बरोबरच बीएड केले. बीएड कॉलेजच्या जी एस ची निवडणूक लागली. चंदूने आमच्या मित्रांमध्ये जीएसची निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त केला.

आम्ही सगळे तयारीला लागलो, आणि चंदुने ऐनवेळी नॉमिनेशन फॉर्म न भरण्याचा निर्णय घेतला. आम्ही मित्रांनी त्याला खूप आग्रह केला, त्याने सांगितले की, माझ्या उमेदवारीमुळे निवडणूक जातीय वळणावर जात असेल तर मला ते चालणार नाही.
आम्ही बीएड झालो, मी सिध्दार्थ हायस्कूलला तर चंदू सह्याद्री हायस्कूलला जॉईन झाला. आम्ही राष्ट्र सेवा दल, समता आंदोलन, नामांतर आंदोलन, मंडल आंदोलन, हमाल पंचायत यात सक्रीय होतो. त्यावेळी शाहू फुले आंबेडकरी चळवळ जोरात होती.
चंदू समाजवादी काँग्रेसमध्ये सक्रीय झाला. त्याच्यातील गुणवत्ता शरद पवारांनी हेरली. त्याला आपल्या पक्षात प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिली. चंदूनेही त्या पक्षात स्वतःचा जम बसवला.

बघता बघता १९८५ ची विधानसभा निवडणूक समोर आली. मी जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस होतो, जनता पार्टी पुरोगामी लोकशाही दलाची म्हणजेच पुलोदची घटक पार्टी होती. पुलोदने एस काँग्रेसच्या गंगाधर आंधळे यांना तिकीट दिले. काँग्रेसने मंचरच्या शकुंतला थोरात यांना तिकीट दिले. भाऊसाहेब थोरात काँग्रेस कडून तिकीट मागत होते, त्यांना ते मिळाले नाही. त्यामुळे त्यांचे पुत्र बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष उमेदवारी केली.
मी पुलोदचा प्रचार करीत होतो. चंदूने देखील एस काँग्रेसचे काम करावे असा माझा आग्रह होता. चंदूने माझे ऐकले नाही. आमच्यात मतभेद झाले. चंदूने बाळासाहेब थोरात यांचा प्रचार केला. त्यासाठी एस काँग्रेसचा त्याग केला .या निवडणुकीतील एका प्रचारसभेत चंदूने समाजवादी नेते नानासाहेब गोरे ,एसेम जोशी यांच्यावर टीका केली. मला खूप राग आला. मी म्हणालो अपक्ष उमेदवाराचा प्रचार हि राजकीय दिवाळखोरी आहे. अपक्ष उमेदवारासाठी एसेम सारख्या ऋषीतुल्य नेतृत्वावर टीका करणे हि तर तू खूप मोठी चूक आहे. माझे आणि चंदूचे कडाक्याचे भांडण झाले, पण मैत्रीत खंड पडला नाही.

निवडणूक झाली, बाळासाहेब थोरात निवडून आले, त्यांचा झंझावाती प्रचार चंदूने केला होता. खरे तर बाळासाहेब थोरात यांच्या विजयात चंदूचा मोलाचा वाटा होता. त्यांच्यासाठी त्याने एस काँग्रेस मधील प्रदेश पातळीवरील नेतृत्वाचा त्याग केला होता. बाळासाहेब थोरात यांच्या विजयाचे श्रेय चंदूला देण्यात तत्कालीन सरंजामी पुढाऱ्यांनी हात आखडता घेतला. चंदू त्यामुळे आतून दुखावला गेला. सरंजामी व्यवस्थेला आव्हान म्हणून त्याने थेट भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्याने एका सभेत एसेम जोशी, नानासाहेब गोरे यांच्यावर टीका केल्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली. मी सह्याद्री संस्थेत नोकरीला आहे म्हणून मी कोणाचा खाजगी नोकर नाही. आम्हाला सरकार पगार देते. मी भाजपाचे काम करणार, कोणाला काय करायचे ते करा असे त्याने जाहीर आव्हान दिले . त्याच्या या धाडसाचे मी स्वागत केले पण भाजपा जॉईन केल्याबद्दल नापसंती व्यक्त केली.
चंदूने रणजीत स्पोर्ट्स क्लबच्या स्थापनेत पुढाकार घेतला. एक चांगली क्रीडा चळवळ संगमनेर शहरात नावारूपाला आली त्यात चंदू सक्रीय होता.
चंदूची विचारधारा आणि भाजपची विचारधारा भिन्न असल्यामुळे चंदू भाजपात रमणे शक्यच नव्हते. तो लवकरच भाजपमधून बाहेर पडला. त्याची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. चंदू काँग्रेसमध्ये परतला पण काँग्रेस मधील सरंजामी व्यवस्था आणि त्याचा मेळ बसला नाही. त्यामुळे काहीकाळ तो राजकीय आघाडीवर निष्क्रीय झाला. सामाजिक सांस्कृतिक कामात व्यस्त झाला.

सह्याद्री संस्थेचे व्यवस्थापन मंडळ आणि त्याचे सूत कधीच जमले नाही. तो त्याच्या भूमिकेवर ठाम राहून भांडत राहिला.चुकीच्या निर्णयांना विरोध करीत राहिला. कोर्टाचा दरवाजा ठोठावला. व्यवस्थापन मंडळापुढे दबला नाही.
विविध शिक्षण संस्था अनुशेष भरत नसत, रोस्टर प्रमाणे पदोन्नती देत नसत चंदूने त्याविरोधात एल्गार पुकारला. रस्त्यावरची लढाई, कोर्ट कचेरी या मार्गाने त्याने अनेकांना न्याय मिळवून दिला.
२०१४ साली देशात सत्तांतर झाले. संघ परिवार अधिक सक्रिय झाला. धार्मिक विद्वेष वाढला, दलित अत्याचाराच्या घटना वाढल्या.या पार्श्वभूमीवर पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची एकजूट झाली पाहिजे यांसाठी चंदूने पुढाकार घेतला. सत्यशोधक विचार मंचाची स्थापना केली आणि त्यात पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना सामावून घेतले. व्याख्यान, शिबीर, बैठका
यांचा धडाका सुरु केला. सर्व परिवर्तनवादी कार्यकर्ते एकत्र आल्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांत एक नवा जोश संचारला. हे उपक्रम राबवतांना कोणत्याही महाशक्तीची मदत घ्यायची नाही,कार्यकर्त्यांच्या पैशातूनच हे उपक्रम राबवायचे हे पथ्य त्याने शंभर टक्के पाळले त्यामुळे हे सर्व उपक्रम कोणीही हायजॅक करू शकले नाही.


नंतरच्या काळात चंदूच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या, मधुमेह बळावला, बी पी त्रास देऊ लागला, घुडघे दुखायला लागले चंदूच्या हालचालींवर निर्बंध आले.पण चंदू हरला नाही त्याने गुडघे बदलले, बायपास सर्जरी केली , तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत तो प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीत सक्रीय झाला. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्या आघाडीची धुरा त्याने समर्थपणे सांभाळली.असा हा लढवय्या,विद्रोही, चळवळ्या चंदू आयुष्यात कोणापुढे झुकला नाही, आपल्या स्वाभिमानाशी त्याने तडजोड केली नाही. भूमिका घेतांना कधी डगमगला नाही. भूमिका बदलताना परिणामांची पर्वा केली नाही.
असा चंदू अचानकपणे इहलोकयात्रा संपवून निघून गेला. त्याच्या स्मृती जपणे एवढेच आपल्या हातात आहे, त्या जपू या.दिवंगत चंद्रकांत पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
– हिरालाल पगडाल, संगमनेर ९८५०१३०६२१
