तरुणाची हत्या करुन प्रेताची विल्हेवाट लावणारे प्रेमीयुगुल पकडले !

प्रेमाच्या वादातून झालेल्या खुनाची स्थानिक गुन्हे शाखेकडुन उकल..

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

गोदावरी नदीच्या पात्रात शेवगाव तालुक्यातील मुंगी गावच्या शिवारात एका तरुणाचे प्रेत आढळून आले होते. या प्रकरणी अकस्मात मृत्यू गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत संशय आल्याने सखोल तपास केला असता ही हत्या असून प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असल्याचे समोर येऊन हे कृत्य करणाऱ्या प्रेमी युगुलाला पकडले आहे. या प्रेमी युगुलासह त्यांचा एक साथीदार देखील असल्याचे उघड झाले आहे.

गोदावरी नदीपात्रालगत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे 30 वर्षे वयाचे अनोळखी प्रेत मिळून आले होते. शेवगांव पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यु रजि. नंबर 95/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे नोंद करण्यात आले होती. सदरचा अकस्मात मृत्यु हा संशयास्पद असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, भगवान धुळे व सारिका दरेकर अशांना नेमण्यात आले होते.

पथकाने घटनाठिकाणी भेट देऊन मृतदेहाची बारकाईने पाहणी केली असता मयताच्या गळ्यास धारदार हत्याराने कापलेले दिसुन आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन तसेच घटनाठिकाणचे आजूबाजूच्या शेत मालक यांचेकडे चौकशी केली परंतु काहीएक उपयुक्त माहिती मिळाली नाही. मयताचे प्रेत हे गोदावरी नदी पात्रामध्ये मिळून आलेले असल्याने व गोदावरी नदी ही पैठण परिसरातून वाहत येत असल्याने पथकाने पैठण तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन येथे दाखल मिसींगची माहिती घेतली असता मयताच्या वर्णनाशी मिळतीजुळती हकीगत असलेल्या इसमाची हार्सुल पोलीस स्टेशन येथे मिसींग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार मिसींगमधील नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी मयतास ओळखून मयताचे नांव सचिन पुंडलिक औताडे (वय 32 वर्षे, रा. कोलठाणवाडी रोड, शिवनेरी कॉलनी, हार्सुल, छत्रपती संभाजीनगर) असे असल्याचे सांगितले.

मयत सचिन याचा प्रेमाच्या वादाच्या कारणातून खून झाला असल्याचा प्राथमिक संशय आल्यानंतर तपासकामी नेमण्यात आलेले पथक आरोपींची माहिती काढत असतांना सदरचे आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जाऊन 1) श्री दुर्गेश मदन तिवारी (रा. वडोद, (कान्होबा), ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर, 2) श्रीमती भारती रविंद्र दुबे (रा. फ्लॅट नं. 201, , एस. एस. मोबाईल शॉपी जवळ, कॅनोट प्लेस सिडको, जि. छत्रपती संभाजीनगर) या दोघांनी व त्यांचा साथीदार 3) अफरोज खान (पुर्ण नांव माहित नाही रा. खटखट गेट, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यास बोलावून घेऊन मयताचा चाकुने गळा कापून खुन केल्याचा व अफरोज खान याचेकडील कारमध्ये त्याचे प्रेत टाकुन प्रेताची तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेला चाकू, कपडे याची विल्हेवाट लावली असल्याची कबुली दिली आहे.

मयताचा भाऊ राहुल पुंडलिंक औताडे याने दिलेल्या तक्रारीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 720/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) प्रमाणे दिनांक 17/08/2025 रोजी आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सलग 4 दिवस तपास करुन मयताची ओळख पटवुन आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. ताब्यातील आरोपींना शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. 720/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1), 3(5) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी शेवगांव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्ह्याचा पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!