संगमनेरात गोकुळाष्टमी निमित्त ‘आय लव संगमनेर’तर्फे भव्य दहीहंडी उत्सव व वेशभूषा स्पर्धा संपन्न !
आमदार सत्यजित तांबे यांची संकल्पना...
‘आय लव संगमनेर’च्या माध्यमातून दहीहंडी व सांस्कृतिक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद !
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 17
संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत असणारी ‘आय लव्ह संगमनेर’ या संस्थेच्या माध्यमातून गोकुळाष्टमी निमित्त भव्य दहीहंडी उत्सव व वेशभूषा स्पर्धा कार्यक्रम उत्साहात पार पडला. १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत संगमनेर शहरातील तब्बल २२ ठिकाणी एकाचवेळी दहीहंडी सोहळा तसेच राधा-कृष्ण वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.

या उपक्रमात बालकांनी कृष्ण-राधा वेशभूषेत सुंदर सादरीकरण केले तर युवकांनी थरारक दहीहंडी फोडून उत्सवाला रंगत आणली. २२ ठिकाणांमध्ये देवी गल्ली मित्र मंडळ, ज्ञानेश्वर गल्ली मित्र मंडळ, रेणुका उत्सव मित्र मंडळ साळीवाडा, महाराणा प्रताप युवक मंडळ चव्हाणपुरा, इंदिरानगर युवा प्रतिष्ठान, भीम गर्जना मित्र मंडळ, नवख्या गणपती मित्र मंडळ यांसह अनेक प्रमुख मंडळांचा सहभाग होता.

उत्सवात बालकांसाठी शालेय शिक्षणोपयोगी गिफ्ट्स, महिला भगिनींसाठी विशेष बक्षिसे तर दहीहंडी विजेत्या मंडळांसाठी श्रीकृष्ण मूर्ती व आकर्षक पारितोषिके देण्यात आली. यावेळी गोकुळाष्टमीच्या निमित्ताने संगमनेर शहरात भक्तिभाव, पारंपरिक साजरेपणा आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
संगमनेरच्या युवकांमध्ये अमाप ऊर्जाशक्ती आहे. त्यांना नेहमीच आपले कौशल्य दाखवण्यासाठी व समाजकार्यात सहभागी होण्यासाठी व्यासपीठ मिळाले पाहिजे. याच भावनेने संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत असणारी ‘आय लव्ह संगमनेर’ ही संस्था आपण शहरातील युवक, महिला व बालकांना एकत्र आणून सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणेतून समाजबंधन अधिक मजबूत करत आहोत.– आमदार सत्यजीत तांबे
