खंडणी प्रकरणी निलंबित असलेल्या एलसीबी अधिकाऱ्यांची चौकशी थंडावली !
चौकशी अधिकाऱ्यांचा नो रिस्पॉन्स !!
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
राज्यातील पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर सर्वत्र टीका होत आहे. अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली आहे. पोलिसांच्या भूमिके विरोधात आंदोलने देखील चालू आहेत. अशी परिस्थिती सर्वत्र असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दीड कोटी खंडणी घेण्याचा प्रकार केला असून पोलीस अधीक्षकांनी चौघांना निलंबित केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. मात्र अनेक दिवस होऊन गेले तरी या चौकशीतून अद्याप पर्यंत काहीच निष्पन्न झाले नसून चौकशी अक्षरशः थंडावली आहे. चौकशीचा फारच ठरवून कुठलीही कारवाई न होता हे प्रकरण गुलदस्तात जाते की काय अशी शंका व्यक्त होत आहे.

आर्थिक गुन्ह्यातील एका आरोपीकडून कायद्याचा नियमांचा खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवीत एलसीबी चे पोलीस उपनिरीक्षक आणि तीन हवालदारांनी त्या संबंधित व्यक्तीकडून दीड कोटी रुपयांची खंडणी उकळली आहे हे पैसे बँकेच्या विविध खात्यांवर ट्रान्सफर करण्यात आले आहेत विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पार्किंग मध्ये हा उद्योग करण्यात आला. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, हवालदार मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे या चौघांना निलंबित केले आहे. ही कारवाई 21 जुलै रोजी करण्यात आली.

या प्रकारामुळे अहिल्यानगर पोलीस दलात खळबळ उडाली होती एलसीबीच्या या कारवाईचे प्रकरण चर्चेत आले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांना याप्रकरणी चौकशी अधिकारी नेमण्यात येऊन सदर प्रकरणी चौकशी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले. मात्र या चौकशीतून अद्याप पर्यंत कोणतेही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
चौकशी अधिकाऱ्यांचा नो रिस्पॉन्स
सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देऊन सुमारे वीस दिवस झाले असले तरी कुठलीही कारवाई किंवा यातून काही निष्पन्न झाले नसल्याचे चित्र समोर आले आहे. या संदर्भात चौकशी अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून सोशल मीडियातून व्हाट्सअप द्वारे त्यांना मेसेज करूनही दोन दिवसात त्यांनी कोणताच रिस्पॉन्स दिला नाही. सर्वसामान्य नागरिकांवर असा आरोप जरी झाला असता तरी त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकण्यात आले असते. येथे फक्त चौकशी करण्याचे काम सुरू आहे, ती ही गेल्या वीस दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे चौकशी नेमकी चालू आहे की थंडावली आहे हे कळण्यास मार्ग नाही.

दीड कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेचा अपहार करण्यात आला आहे. ही खंडणी मिळवण्यासाठी एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी दबावतंत्र धमक्या कायदा याचा सर्रासपणे गैरवापर केला असल्याचे देखील समोर आले. पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाच्या आवारात वेगवेगळ्या सूचना देऊन पैसे बँक खात्यात ट्रान्सफर केले. हे पैसे कोणाच्या बँक खात्यात जमा झाले ? हे देखील अद्याप पर्यंत समजू शकलेले नाही. तसेच एवढी सर्व बेकायदेशीर घडामोड होऊन देखील कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. अशी सवलत इतरांच्या बाबतीत दिली जात नाही. लगेच गुन्हा दाखल करून त्यास तुरुंगात टाकण्यात येते.
