पूर्वेकडचे मतलबी वारे संगमनेचा धार्मिक सलोखा बिघडवणार !
विकासात खोळंबा – बाजार पेठ उध्वस्त करण्याचा प्रयत्न
सणासुदीचे आणि धार्मिक उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. पुढचा काळ हा अशा घटनांसाठी समाजकंटकांना पर्वणीचा काळ असतो. दोन्हीकडच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत सावध असायला हवे…. सोशल मीडियातून चिथावणीखोर वादग्रस्त पोस्ट केल्या जातील. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होईल… पोलिसांनी अलर्ट असायला हवे.. तेही अर्थात निष्पक्षपणे…. कारण दोन्हीकडे काही मंडळी धुतल्या तांदळासारखी नाही.
विशेष प्रतिनिधी, संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
सुसंस्कृत आणि शांतता हे ब्रीद घेऊन दंगली पासून मुक्त झालेल्या संगमनेर शहराची व तालुक्याची शांतता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून थेट आतापर्यंत गेल्या दहा ते अकरा महिन्यात अनेक वेळा बिघडवण्याचा प्रयत्न झाला. पूर्वीकडेचे मतलबी वारे त्यास खतपाणी घालत आहे. मेंदूवर जातीवाद धर्मवादाच्या भूताने ताबा घेतलेली काही राजकीय पक्षांची मंडळी त्यात तेल ओतत असून संवेदनशील संगमनेरला पुन्हा कायदा दंगलींच्या कचाट्यात ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पूर्वी धार्मिक भांडणे जातीयवाद आणि दंगली यामुळे संगमनेरच्या युवकांचे आणि संगमनेरचे किती नुकसान झाले, याची माहिती नव्या पिढीने घ्यायला हवी.

संगमनेरचा सामाजिक सलोखा विस्कळीत करण्याचा डाव..
बहुजन समाजातल्या तरुण मुलांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्या मनात जातीयवाद धर्मवादाचे विष पेरण्याचे काम काही राष्ट्रीय म्हणणाऱ्या संघटनांकडून सुरू आहे. किरकोळ कारणावरून हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचे प्रकार संगमनेरत घडले आहेत. सकल हिंदू या गोंडस नावाखाली विधानसभा निवडणुकीपूर्वी बाहेरून आलेल्या मंडळींनी दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी चिथावणीखोर प्रक्षोभक भाषणे केली. त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल झालेले आहेत. यात भरडली गेली ती बहुजन समाजातील शेतकऱ्यांची तरुण मुले. गुन्हे दाखल झाले तरुण मुलांवर. आता त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भविष्यातही त्यांना अडचणी येणार आहेत. मात्र प्रक्षोभक आणि भडक भाषणे करून निघून गेलेले मात्र निवांत आहेत.

संगमनेरची बाजारपेठ देशोधडीला लावण्यासाठी…
नगर जिल्ह्यात सुजलाम सुफलाम असलेल्या संगमनेरच्या सर्वच व्यवसायांना, व्यापाऱ्यांना संकटात आणून या तालुक्याचा सर्वसामान्य नागरिक शेतकरी व्यापारी कसा मोडला जाईल यासाठी नेहमीच प्रयत्न झालेले आहेत. पूर्वेकडचे मतलबी वारे वेगवेगळे अजेंडे घेऊन आणि तालुक्यातील त्यांचे वेगवेगळे लाभार्थी आणि पंटर पुढे करून संगमनेरच्या शांततेला गालबोट लावण्यासाठी अनेक उद्योग करत असतात. संगमनेरची बाजारपेठ उजाड करण्याचा प्रयत्न आहे आणि अशा मंडळींना साथ देणाऱ्यांना भविष्यात हे भोगावे लागेल त्याच मार्गावर ही मंडळी चालली आहे.

विकासाऐवजी फक्त राजकारण…
शेती पाणी रोजगार महागाई वीज रस्ते शिक्षण विकास मूलभूत सोयीसुविधा यावर कोणीही बोलत नाही. विशेष म्हणजे सर्वच पुढारी हे विषय सोडून आता भांडणे करणे, भांडण लावणे, एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करणे, एकमेकांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करणे, पोलीस यंत्रणेचा गैरवापर करणे, सत्तेचा गैरवापर करणे अशा प्रकारचे उद्योग करत बसले आहेत. ह्या राजकारणातून कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या संगमनेर तालुक्यातील युवकांचे फार मोठे नुकसान होणार आहे आणि भविष्यात हीच मंडळी यास जबाबदार असणार आहे.

विचार तर करा….
दहा महिन्यापासून संगमनेरातील हिंदुत्ववादी मंडळींनी ज्या समस्यांवर आणि प्रश्नांवर आंदोलने केली ती सर्व सत्ता असून आताही जैसे थे आहेत. त्यातला एकही प्रश्न सोडविला गेलेला नाही. नव्याचे नऊ दिवस झाले. मिटींगा घेतल्या. भाषणे ठोकली. मात्र एकही समस्या सुटलेली नाही. हे चित्र सर्वांसमोर आहे. आंदोलन करणाऱ्यांच्या या संदर्भातील अपेक्षा देखील आता संपुष्टात येत चालल्या आहेत. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय अद्यापही का निघाला नाही याचा विचार संगमनेरच्या सुज्ञ नागरिकांनी करायचा आहे. राजकीय पक्षांचे समर्थक बगलबच्चे लाभार्थी त्याचा विचार करणार नाहीत.

सणासुदीचे आणि धार्मिक उत्सवांचे दिवस सुरू झाले आहेत. पुढचा काळ हा अशा घटनांसाठी समाजकंटकांना पर्वणीचा काळ असतो. दोन्हीकडच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत सावध असायला हवे…. सोशल मीडियातून चिथावणीखोर वादग्रस्त पोस्ट केल्या जातील. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होईल… पोलिसांनी अलर्ट असायला हवे.. तेही अर्थात निष्पक्षपणे…. कारण दोन्हीकडे काही मंडळी धुतल्या तांदळासारखी नाही.
