घरकुल योजनांचा गैरफायदा घेत संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उपसा !

 संगमनेर प्रतिनिधी दिनांक 7

 

ज्या ज्या लोकांना योजनांसाठी वाळू उपसा करण्याची परवानगी दिली आहे, त्यांचा परवाना, तसेच त्याच्या अटी शर्ती आणि किती ब्रास वाळू उपसायची याची सर्व माहिती जाहीर करावी. तसेच असा वाळू उपसा करणाऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात यावी. जेणेकरून असा वाळू उपसा करण्याचा ठेका नेमका कोणाला मिळतो हे देखील नागरिकांसमोर येईल. 

 

संगमनेर तालुक्यात वाळू तस्करी, अवैध वाळू उपसा, अवैध वाळू साठे तसेच गौण खनिजाचे अवैध उत्खनन करण्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. तालुक्यात कुठे ना कुठे असे उद्योग सुरूच असतात. आता संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या घरकुल योजनांचा गैरफायदा घेत अधिक प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून त्याची खासगी विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

संगमनेर तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये घरकुल योजनांचे काम सुरू आहे. या योजनांसाठी आवश्यक असलेले गौण खनिज आणि वाळू उपसण्याचा तात्पुरता परवाना काही वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. ज्यांना हा परवाना मिळाला आहे त्यांनी फक्त योजनेच्या कामासाठीच वाळू उपसा करायचा आहे अशी महत्त्वाची अट या कामांमध्ये संबंधितांना बजावण्यात आलेली असते. मात्र काही जण योजनेला वाळू देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून त्याची खासगी विक्री करत असल्याची चर्चा असून यासंबंधी तहसील विभागाने कड़क कारवाई करून वाळू उपशासंदर्भात सत्य माहिती घ्यावी अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

ज्या ज्या लोकांना योजनांसाठी वाळू उपसा करण्याची परवानगी दिली आहे, त्यांचा परवाना, तसेच त्याच्या अटी शर्ती आणि किती ब्रास वाळू उपसायची याची सर्व माहिती जाहीर करावी. तसेच असा वाळू उपसा करणाऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात यावी. जेणेकरून असा वाळू उपसा करण्याचा ठेका नेमका कोणाला मिळतो हे देखील नागरिकांसमोर येईल.

जेथून हा वाळू उपसा केला जातो किंवा ज्या योजनेवर वाळू देण्यात येते त्या ठिकाणी कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करून संबंधित वाळू उपसा हा फक्त योजनेसाठीच होत आहे ना ? याची खात्री करून घ्यावी. तसेच वाळू उपशाचा स्पॉट आणि तेथे झालेला वाळू उपसा याची सुद्धा मोजणी करून खातरजमा करून घ्यावी. तसेच तालुक्यातील काही खास गुप्त आणि राजकीय संरक्षित ठिकाणांमध्ये, काहींच्या शेतात मोठ्या प्रमाणावर वाळू साठे करून ठेवण्यात आलेले आहेत. याची सुद्धा माहिती घेऊन ताबडतोब अशा ठिकाणी कारवाई करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!