भाजप आयोजित योगा डे मध्ये फ्री स्टाईल महाकुस्ती !!
माइक वरून दोघांमध्ये हाणामारी ; आमदारांचा हस्तक्षेप
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 22
सर्वत्र जागतिक पातळीवर योगा डे साजरा होत असताना आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी योगा एक सामाजिक चळवळ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत असतानाच संगमनेर तालुक्यात भाजपने आयोजित केलेल्या योगा डे मध्ये सूत्रसंचालनाच्या वेळी माईकवर ताबा कोणी ठेवायचा यावरून दोन आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच फ्री स्टाईल कुस्ती झाल्याची माहिती समजली असून ही कुस्ती मिटवण्यासाठी थेट आमदार अमोल खताळ यांना मध्यस्थी करावी लागली असल्याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, भाजपच्या वतीने एका मंगल कार्यालयात योगा डे चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आजी-माजी कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महायुतीचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या सौभाग्यवती देखील उपस्थित होत्या. मात्र यावेळी सूत्रसंचालन व इतर बाबतीत माइक वरून कोणी बोलायचे यावरून वाद झाल्याने दोन पदाधिकाऱ्यांमध्ये चांगली हमरी तुमरी बाचाबाची, फ्री स्टाईल कुस्ती झाली असल्याची चर्चा बाहेर आली आहे. या प्रकारामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला होता यासाठी थेट आमदार यांना हस्तक्षेप करून हा वाद थांबवावा लागला असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपच्या या योगा डे चे आयोजन करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याला सूत्रसंचालन करताना दुसरा पदाधिकारी हस्तक्षेप आणि लुडबुड करत असल्यामुळे आणि सातत्याने माइक मध्ये येऊन व्यत्यय आणत असल्याने चिडलेल्या त्या आयोजक पदाधिकाऱ्याने या माजी पदाधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेत सुनावले. दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली आणि नंतर धराधरी पकडापकडी होऊन फ्री स्टाईल कुस्ती सुरू झाली. मात्र सावध झालेल्या इतर पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आमदार खताळ यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला आहे

कार्यक्रमानंतर आमदार खताळ यांनी वाद घालणारे फ्री स्टाईल कुस्ती करणारे आणि आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एकत्र करून शासकीय विश्रामगृहावर एक बैठक घेतली असून या बैठकीत दोघांनाही समजावून सांगितले आणि असे वाद करून पक्षाची बदनामी करू नका असे देखील बजावले असल्याचे समजले आहे. ज्याने त्याने आपापल्या कार्यक्षेत्रात काम करावे. कोणाच्याही कामात लुडबुड करू नये अशा प्रकारे बजावले असल्याची माहिती समजली असून या घटनेची पक्षांतर्गत चर्चा आहे. या संदर्भाने काही पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता किरकोळ वाद झाला व जागेवरच मिटवला असे त्यांनी सांगितले.
