संगमनेर तालुक्यात गौण खनिज तस्करी ला उधाण !
पूर्वेकडच्या डॉक्टरचे आशीर्वाद !!
कारवाई केली तरी माहिती देण्यास तहसील कार्याकडून टाळाटाळ
तहसीलदार धीरज मांजरे यांची नेहमीप्रमाणे चुप्पी
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 17
संगमनेर तालुक्यातील खळी पिंपरी (शिवलापूर) गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज वाळू तस्करी करताना जेसीबी आणि डंपर टीपर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून पकडले. मात्र साधारण दुपारी सुरू झालेली ही कारवाई दाबण्यासाठी विविध स्तरावरून दबाव येण्यास सुरू झाल्याने खळी ते संगमनेर हे अंतर पार करण्यासाठी संध्याकाळचे सात वाजले. शंभर दीडशे जणांचा जमाव, पूर्वेकडच्या डॉक्टरांचे येणारे फोन आणि सत्तेचा चालू असलेला लपंडाव यामध्ये महसूल कर्मचारी आणि अधिकारी पिसून निघत होते. वेळोवेळी माहिती मागूनही कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात होती. कालपासून आज सकाळपर्यंत “तहसीलदार धीरज मांजरे यांनी कारवाईबाबत नेहमीप्रमाणे चुप्पी धरली आहे.”

मुरूम वाहतूक करणारा एक डंपर आणि जेसीबी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी आज दुपारच्या वेळी संगमनेर तालुक्यातील खळी पिंपरी येथे पकडला. मात्र सदर वाहने जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये कार्यवाहीसाठी आणण्यात तब्बल सहा ते सात तासाचा वेळ लागला. घटनास्थळी प्रत्यक्ष असणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी याबाबतची माहिती महसूल प्रशासनातील कर्मचाऱ्यांना विचारली तर त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

सदर वाहने खळी पिंप्रीपासुन ते संगमनेर शहरात येई पर्यंत महसूल अधिकाऱ्यांना एका पदावर नसलेल्या मात्र राजकीय वरदहस्त लाभलेल्या पुढाऱ्याचा धाक दाखवत रस्त्यावर तिन ते चार वेळा या तस्करांनी अडथळा निर्माण केला. मात्र ज्या ज्या ठिकाणी वाहनांच्या मालकांनी अर्थातच तस्करांनी अडवणूक केली त्या त्या ठिकाणी नागरीकांची बघ्यांची गर्दी जमा होत होती. तस तसे चर्चेला देखील उधान येत होते. महसुलच्या कर्मचाऱ्यांनी थोडा पुढे थोडा पुढे असं करत करत शेवटी संगमनेर गाठलच आणि डंपर तसेच जेसीबी पोलीस कॉलनीत लावले.

पोलीस लाईन मध्ये सदर वाहने लावल्यानंतर गौण खनिज तस्करांचे समर्थक, वाहनाचे चालक मालक यांना महसूल कर्मचाऱ्यांनी नावे, माहिती विचारली असता त्यांनी ती देण्यासाठी टाळाटाळ सुरू केली. तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या मदतीने दबाव आणण्यास देखील प्रयत्न केला. याचवेळी राजकीय नेत्यांचे फोन खणावत होते. पूर्वेकडच्या एका डॉक्टर पुढार्याने देखील अनेक प्रकारे दबाव आणून कायदेशीर कारवाई न करण्याचा गोड सल्ला दिला. हा प्रकार पोलीस लाईन मध्ये देखील अर्धा ते पाऊण तास सुरू होता. येथे देखील माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्याची टाळाटाळ करण्यात आली.

संगमनेर तालुक्यातील खळी पिंपरी या परिसरात खंडोबा देवस्थानाच्या डोंगराच्या पायथ्याला दुपारी तलाठी अंकित मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली. या पथकात डिग्रस मालुंज्याचे ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह एक महिला कर्मचारी व इतरही पाच ते सहा महसूलचे कर्मचारी सहभागी होते. सदर कारवाई मधे एक जेसीबी क्रमांक MH17 CX 1426 असुन एक मागे पुढे विना नंबर प्लेटचा डंपर ताब्यात घेतला असून एक डंपर चालकाने घटनास्थळा वरून पळवून नेलाअसल्याचेही माहिती समजली आहे.
महसूलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पकडलेल्या वाहनांवर नेमकी काय कारवाई होते किंवा नेहमीप्रमाणे दोन-तीन दिवसात ही वाहने पोलीस लाईन येथन अचानक गायब होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

तहसीलदारांची चुप्पी..
यासंदर्भात संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितले की, मी कारवाईच्या दिवशी संत निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यात होतो, असा मेसेज करून अंकित मंडलिक आणि महेश वर्पे या दोन तलाठी यांचे नंबर दिले. मात्र दोघांशीही संपर्क केला असता हे दोन्हीही तलाठी फोन उचलत नाहीत. त्यामुळे कोणत्यातरी मोठ्या साहेबांच्या दबावामुळे माहिती देण्यास टाळाटाळ केले जात असल्याचे दिसून येत आहे.
