आटपाट नगरीत नवीन विद्यमानांच्या अवतीभवती जमली टोळी ! 

सोशल मीडियातून नवी कोरी टीका…

आटपाट नगरीत नवीन विद्यमान आणि त्यांच्या टोळी विषयी विविध चर्चा आता रंगू लागल्या आहेत. या टोळीने निरनिराळे उद्योग सुरू केले असून आता टोळीची चर्चा थेट सोशल मीडियातून होऊ लागली आहे. सोशल मीडियात आलेल्या पोस्टवर दिसणाऱ्या प्रतिक्रिया पाहता यात नेमकी कोणाच्या बुडाखाली आग लागली आहे हे स्पष्टपणे दिसून येते.

आटपाट नगरीच्या परगाण्यातील पूर्वेकडचे सभेदार दैवत असणाऱ्या नव्या कोऱ्या विद्यमान पंटर साहेबां भोवती जमा झालेल्या ‘टोळीची टोळधाड’ आटपाट नगरीतील महसूल पोलीस कृषी पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम वनविभाग जल जीवन आदी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जाणवू लागली आहे. एवढेच नव्हे तर नुकताच एक हिसका एसटी महामंडळाला देखील दिसून आला आहे.

आटपाट नगरीतील लाडक्या बहिणींसाठी संसार उपयोगी साहित्याची योजना आली आहे. या योजनेमध्ये दहा हजार रुपयांचे भांडे दिले जाणार आहेत असे सांगितले जाते किंवा सामान दिले जाणार आहे असे सांगितले जाते. त्या योजनेचे फॉर्म भरून घेण्यासाठी लाडक्या बहिणीकडून एका मंगल कार्यालयात प्रत्येकी सातशे रुपयांची वसुली केली असल्याचे देखील बोलले जात असून आटपाट नगरीत आता काय काय घडेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सोशल मीडियातून कार्यकर्त्यांनी पोस्ट केली असून त्यातील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, नवीन विद्यमानांनी… किती कामे महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिली ? की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ? या आशयाची पोस्ट सोशल मीडियात करण्यात आली असून याचा खरा अर्थ विद्यमानांच्या टोळीला समजला आहे. आटपाट नगरीतली कामे भलतीच मंडळी पळवीत असल्याचे सुद्धा आरोप होत असून सोशल मीडियातून यावर ‘बोलबच्चन’ घडत आहे.

माजी सुभेदारांच्या अवतीभवती लाभार्थ्यांचा गराडा पडल्याचे चित्र आटपाट नगरीत नेहमी दिसत होते. लाभार्थ्यांनी घातलेला धुमाकूळ माजी सुभेदारांचे जहाज बुडवून गेला. मात्र त्याला अनेक वर्ष जावे लागले असे बोलतात. जलसंपदा दैवत असलेल्या नव्या कोऱ्या विद्यमानांच्या भोवती काही महिन्यातच टोळी जमू लागल्याने पुढे काय असा प्रश्न आटपाट नगरीतील रयतेसमोर चर्चेला आलेला आहे. आणि त्यावर विद्यमानांचा पक्ष (?) सोडून विद्यमानांच्या सहकारी पक्षांमध्ये मात्र चविष्ट चर्चा सुरू आहेत.

आटपाट नगरीत ‘हॉट’ विषय असलेल्या कत्तलखान्यांबाबत, गोवंश हत्या, गोवंश वाहतूक आणि यासंबंधी असलेल्या सर्व घडामोडीतील ‘हप्तेखोरी’ लवकरच चव्हाट्यावर येणार असल्याचे बोलले जात असून यात ‘घरचे भेदीच – भेद करण्यासाठी चक्रव्यूह रचत आहेत. याबाबतही नवीन विद्यमान कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील काळात आंदोलनजीवी, पत्रक बाजी, दिखावगिरी करणारे आता आटपाट नगरी येथील विविध अवैध व्यवसायातून वसुली करण्याच्या मागे लागल्याचे चित्र आहे. थोडक्यात लाभार्थ्यांनंतर आता रयतेला ‘टोळीचा प्रताप’ पहावा लागणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!