सोशल मीडियातून पोलीस अधिकारी, तहसीलदार यांच्या इज्जतीचा पंचनामा !
संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या पोस्ट व्हायरल
महसूल पोलीस प्रशासनाच्या त्या अधिकाऱ्यांचे चक्क मौन
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 28
सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप, राजकीय हेवेदावे आणि अनेक प्रकारचे किस्से सुरू असतात. संगमनेर मध्ये मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महसूल विभागातील तहसीलदार, पोलीस अधिकारी यांच्या नावांसह थेट वेगवेगळे आरोप करून त्यांच्या ‘इज्जतीचा पंचनामा’ एका राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सोशल पोस्ट मधून केला असला तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत चक्क मौन बाळगल्याने कुठलीही कार्यवाही न होता या सोशल मीडियातील व्हायरल पोस्ट बाबत मात्र सर्वत्र चर्चा सुरू आहे.

संगमनेर शहरातील अवैध धंद्यांच्या बाबतीत थेट तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर देखील आरोप करण्यात आले असून वाळू तस्करीचे हप्ते आणि इतर बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच संगमनेरचा सत्ताधारी बदल हा चांगल्या कामांसाठी करण्यात आला असून आता अशी हप्तेखोरी बंद करा असे थेट आव्हानच या पोस्ट मधून देण्यात आले आहे.

त्या पदाधिकाऱ्याने या पोस्ट व्हायरल केल्या मात्र काही वेळातच त्या डिलीटही करून टाकण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत चार दिवस होऊन गेले तरी चक्क मौन बाळगले असून त्यांचे मौन म्हणजे त्या आरोपांना दुजोरा तर नाही ना ? अशी चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे व्यक्तिगत पातळीवर देखील टीका करण्यात आली असून थेट नावे घेतल्याने या अधिकाऱ्यांच्या भूमिका बाबत शंका कुशंका व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे एवढे टीका होऊ नये अधिकाऱ्यांनी गप्प बसणे म्हणजे ‘भ्रष्टाचाराची बिर्याणी’ कोण खात आहे असा सवाल निर्माण झाला आहे.
