अवैधरित्या फ्लेक्स आणि बॅनर लावून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर कारवाई नाही !
संगमनेर नगरपालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष….
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 11
संगमनेर शहरात अगदी मोक्याच्या ठिकाणी नगरपालिकेच्या सार्वजनिक जागांवर विविध राजकीय पक्षांसह इतर खासगी व्यावसायिक आणि व्यापारी जाहिरातींचे फ्लेक्स बोर्ड, बॅनर वारंवार लावण्यात येत असून नगरपालिकेने असे बॅनर लावू नये म्हणून लिहिलेला फलक देखील दुर्लक्षित करण्यात येऊन सरळ सरळ बॅनर लावले जात आहेत. विशेष म्हणजे या संदर्भातील न्यायालयाचे आदेश हे फक्त चर्चेपुरते राहिले असून आता या कायद्याने आणि न्यायालयाच्या आदेशानुसार यासाठी जबाबदार असणाऱ्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

संगमनेर शहरातील प्रसिद्ध वकील सैफुद्दीन शेख यांनी अगदी पुराव्यासह अवैध लावण्यात येणाऱ्या फ्लेक्स बोर्डची माहिती सोशल मीडियातून संगमनेरच्या मुख्याधिकार्यांना कळविली असली तरीही कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याचे चित्र आहे. या आधी सुद्धा त्यांनी पालिकेकडे लेखी तक्रारी केलेल्या आहेत, तरी देखील कारवाई होत नाही. त्यामुळे पालिका प्रशासन अशा तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे उघड होत आहे.

संगमनेर शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर पुणे नाका ते थेट इंजिनिअरिंग कॉलेज पर्यंत असे अवैध बॅनर लावण्यात येतात. यातील काही भाग नगरपालिका हद्दीत येतो, तर काही भाग ग्रामपंचायत यांच्या हद्दीत येतो. मात्र कायदा, नियम सर्वत्रच मोडला जात असल्याचे समोर येते.

यावर कळस म्हणजे या बॅनरची आणि फ्लेक्स बोर्डची साईज अतिशय भव्य आणि मोठी असते. हे खाली पडले, एखादा अपघात झाला तर त्यातून मोठे नुकसान होऊ शकते. काही महिन्यापूर्वी अशाच एका राजकीय कार्यक्रमाची एक लोखंडी कमान भर रस्त्यात तुटून पडली होती. सुदैवाने त्यावेळी कोणती जीवित हानी झाली नाही म्हणून ठीक आहे, परंतु हे सर्व धोकादायकच आहे. असे असताना देखील संबंधित विभागाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याने नागरिक हतबल झालेले आहेत.

राजकीय पक्षांनी, संघटनांनी तर फ्लेक्स बोर्ड आणि बॅनर लावण्याचा धुमाकूळ घातला आहे. एकमेकांच्या विरोधात बॅनर लावण्यावरून वाद करायचा आणि भरपूर बॅनर सर्वत्र लावायचे. वाढदिवस निवड, निवडणुका, विजय पराजय, शुभेच्छा याचा धुमाकूळ घालण्यात आलेला आहे. तसेच विविध व्यापारी जाहिराती देखील सर्वत्र लावण्यात आलेल्या असतात. शहराचे मुख्य रस्तेच काय पण उपनगरांमध्ये देखील असा अवैध उद्योग करण्यात येत आहे. झाडांची खोडे, फांद्या, विजेचे खांब जिथे जागा मिळेल तिथे बोर्ड, बॅनर लावले जातात. नगरपालिकेचा संबंधित विभाग याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो.

पालिकेची दादागिरी फक्त सामान्य नागरिकांवर
ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक याच्या नादात पालिकेचे प्रशासन इतर अवैध उद्योग विसरले आहे. कचरा व्यवस्थापनाचा सर्व दबाव सर्वसामान्य नागरिकांवर आणून रोज त्यांना कचरा नेणाऱ्या घंटागाडीतील व्यक्तींकडून दादागिरी करून कारवाई केली जाईल हे कचरे वेगवेगळे करा, ते वेगळे करा, असं करा, तस करा धमकवण्यात येते.
घरपट्टी नळपट्ट्यासाठी तर लाऊड स्पीकर वरून सर्व सामान्य नागरिकांना धमक्या दिल्या जातात. कारवाईची भीती दाखवली जाते. मात्र कायदा अवैध उद्योग, अतिक्रमणे, रस्त्यावरील विविध हातगाड्या, भाजीपाला, फळाची दुकाने, रिक्षा थांबे यावर कुठलीही कारवाई केली जात नसून मुख्याधिकारी फक्त कचरा नियोजनाच्या मागे लागलेले दिसतात, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

पालिकेच्या फलकाची ऐशी तैशी !

नगरपालिकेच्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी आणि पालिकेच्या जागेत फ्लेक्स बोर्ड, बॅनर लावून विद्रूपीकरण करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे फलक पालिकेने संगमनेर बस स्थानकाच्या आवारात लावले आहेत. मात्र या फलकांची देखील ऐशी तैशी करून या फलकाच्या वरच बॅनर फ्लेक्स बोर्ड लावलेले दिसून येतात. आपण पालिकला पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पालिकेच्या कायद्यांना जुमानत नसल्याचे दाखवून देण्यात येत आहे.
