संगमनेर शहराची शांतता बिघडली !
फक्त बोल बच्चन करणारे सत्तेत : कृती नाही
अधिक्रमणे, हाणामाऱ्या, धार्मिक उत्सवातील दादागिरी, सामाजिक तेढ, अवैध धंदे, घरफोड्या, गोवंश हत्या कत्तलखाने, हप्तेखोरीचा धुमाकूळ….
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 22
शांतता आणि संस्कृती ही संगमनेर शहरासह तालुक्याची ओळख होती. मात्र काही महिन्यांपासून ही शांतता, संस्कृती, कायदा व्यवस्था पूर्णपणे बिघडत चालले असून शहरांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, वाढती अतिक्रमणे, बेशिस्त वाहतूक व्यवस्था, जातीयवाद, धार्मिक तेढ वाढवणे, सामाजिक अशांतता निर्माण करणे, अवैध धंदे करणाऱ्यांची दादागिरी, सर्वसामान्यांना मारहाण, हाणामाऱ्या हप्तेखोरीने धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसत आहे.

या सर्वावर कळस म्हणजे घरफोड्या, मोटारसायकल चोरी, चेन स्नॅचींग सारखे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. शहरातल्या कुप्रसिद्ध अवैध कत्तलखान्यांमधून गोवंश हत्या आणि गोमांस तस्करी चालूच आहे. दरवेळी छापे घातल्याचे चित्र दाखवण्यात येत आहे. अगदी संगमनेर पासून ते दिल्ली पर्यंत सत्ता असूनही काही महिन्यापूर्वी बोल बच्चन करणारे लोकप्रतिनिधी, गाव पुढारी, दल, संघटना वाले अवैध कत्तलखाने गोवंश हत्या बंद पाडण्यासाठी कागदी घोडे नाचविणे एवढाच देखावा करून कुठलीही ठोस कृती करताना दिसत नाहीत.

या सर्व प्रकाराने संगमनेर शहरातील शांतताप्रिय नागरिक अस्वस्थ झाले आहेत. असले कायदा मोडणारे प्रकार बंद करावेत अशी मागणी पोलिसांकडे विविध संघटनांनी, सामाजिक संस्थांनी, नागरिकांनी निवेदने देऊन केलेली आहे. प्रसंगी मोर्चा आणि आंदोलन करण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे. असे असतानाही संगमनेर शहर पोलिसांकडून या संदर्भाने गांभीर्याने कुठलेही पाऊल उचलले जात नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता नागरिकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.

संगमनेर शहरात अवैध धंदे करणाऱ्यांची दादागिरी वाढली आहे. विशेषत: अवैधपणे देशी, विदेशी, गावठी दारू विक्री, दारूचे अड्डे, जुगाराचे अड्डे, गांजाची तस्करी, गुटखा विक्री करणारे, गुटख्याचा साठा करणारे गुटखा तस्कर, तसेच शहरातील व्यापारी संकुलांमध्ये लोटो बिंगो चक्री सोरट काळी पिवळी यासारखे जुगार अड्डे, अशा विविध अवैध बेकायदेशीर उद्योगात पुढे असलेले आणि शहरात अतिक्रमण करून धंदे करणारी काही उद्योगी मंडळी सर्वसामान्य नागरिकांवर दादागिरी करत आहेत. मारहाण करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या टपऱ्या मधून सर्रासपणे दारू सह नशेचे पदार्थ मिळतात. येथेही विविध घटना घडल्यामुळे शहराचे वातावरण सध्या अशांत होत चालले आहे.

या सर्व प्रकाराचे परिणाम वेगवेगळ्या धार्मिक उत्सवात देखील दिसून येत आहेत. राजकीय गटबाजी आणि गुंडगिरी तसेच धार्मिक उत्सवांवर आपलाच हक्क दाखवीत दादागिरी करणारी काही मंडळी यांच्यामध्ये देखील वादाच्या ठिणग्या पडून राजकीय हेतू साधण्यासाठी धर्माचा, देवाचा वापर सुरू झाला आहे. व्यवसायाची गरज सांगून अतिक्रमण करणारे, बेशिस्त वाहने उभे करणारे, वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणारे आणि हे सर्व बंद करा, अतिक्रमणे काढून टाका असे सांगणारे “लोकप्रतिनिधी देखील फक्त बोलबच्चनच” करीत असल्याचे आरोप होऊ लागले आहेत. सध्यातरी लोकप्रतिनेकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नेहमीच दुर्लक्ष !
संगमनेर हॉटस्पॉट असताना देखील आणि विविध घडामोडी घडत असताना पोलीस अधीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी संगमनेर पासून हाकेच्या अंतरावर असताना देखील असे उद्योग सातत्याने वाढतानाच दिसतात. या अधिकाऱ्यांनी संगमनेरात येऊन किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कडक सूचना करून कुठलीही कार्यवाही केल्याचे अद्याप तरी दिसून आलेले नाही. पोलीस उपअधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय असताना देखील या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकरणात कधी गंभीर भूमिका घेतली गेल्याचे दिसले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालावे अशा आशयाचे निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. एकंदरीत पाहता संगमनेरची शांतता व कायदा सुव्यवस्था टिकवण्याचे काम ज्या पोलिसांच्या हातात आहे त्यांच्याकडून कुठलीही पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे.
