वतनदाऱ्या टिकवण्यासाठी खबऱ्यांचा बळी जाणार !
आता दोघांचे भांडण तिसऱ्यांची उचलटाक !!
विशेष प्रतिनिधी दिनांक 20
विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीत आटपाट नगरीच्या आजी-माजी मंत्री असलेल्या दोन्ही सूभेदारांची जीवघेणी राजकीय भांडणे झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांच्या पायावर पराभवाचा धोंडा पाडून घेतला. वतनदाऱ्या सर्वश्रेष्ठ असल्याने त्या सांभाळल्याच पाहिजेतच आणि त्यातूनच आपला, आपल्या कुटुंबाचा, सगे सोयऱ्यांचा, भाऊबंदांचा उदरनिर्वाहाचा, पोट भरण्याचा कार्यक्रम चालतो हे उशिराने लक्षात आल्यावर सहकारातून समृद्धी आणि राजकीय खुर्च्या मिळवल्याचे ध्यानात आल्यावर दोघाही सुभेदारांनी एकमेकांत सलोखा करून स्वतःचे राजकीय नुकसान करून घ्यायचे नाही. असे गुप्तपणे भेटीगाठी घेऊन ठरवले. आणि वतनदाऱ्या शाबीत ठेवण्यात यश मिळवले. मात्र या दोघांच्या भांडणात तिसऱ्यांची जी ‘उचलटाक’ झाली आहे ती तशीच चालू असून वेगवेगळ्या निवडणुकांमधून या मधल्या दलालांची अशीच उचलटाक होणार आहे.

आटपाट नगराचे वतनदार म्हणजेच आमचे लाडके सुभेदार सत्तेच्या खुर्च्या टिकवण्यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. राज्यातला या पक्षातून त्या पक्षात जाणारा व ‘फिरता करंडक’ म्हणून प्रसिद्ध असलेले पूर्वेकडेचे सुभेदार यात तरबेज झाले आहेत. मात्र नव्याने ‘पराभवाचा झटका’ बसलेले सुभेदार आता वेगवेगळ्या प्रकारे कोलांट उड्या मारून सत्तेची खुर्ची कशी टिकवता येईल याचे धडे घेत अभ्यास करत असल्याची माहिती आटपाट नगरीच्या हेरांनी मिळवली आहे. यासाठी इकडचे युवराज मदत करत आहेत. तर पूर्वेकडेचे युवराज या आधीच अशा उद्योगांमध्ये आघाडी घेऊन स्वतःची सुभेदारी आणि दुकानदारी सुरू करून बसले आहेत.

दोघाही थोरल्या सुभेदारांची भांडणे विशेषतः राजकीय भांडणे आटपाट नगरीत आणि राज्यात चांगलीच सुपरीचीत आहेत. या भांडणांचा खरा खोटा इतिहास सर्वश्रुत आहे. लुटूपुटूची ही भांडणे गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी मात्र एकमेकांची जिरवण्यात आणि निवडणुकीत पराभव करण्या पर्यंत गेली. हे भांडणाचे शेवटचे टोक झाले. मात्र त्याचा परिणाम पाहिल्यानंतर हळूहळू दोघांच्याही लक्षात आले की, आपल्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होत असून संपूर्ण आटपाट नगरीत आणि सुभेदारीत आपण नवीन सत्ताधारी, हिस्सेदार, वाटेकरी निर्माण करत आहोत. पुढे हेच आपल्या ‘उरावर भस्मासुर’ होऊन बसतील. याचा धोका ओळखल्यानंतर किंवा दोघांच्याही राज्यातल्या राजकीय मालकाने तो लक्षात आणून दिल्यानंतर दोन्ही थोरल्या सुभेदारांनी युवराजांच्या मध्यस्थीने वाद मिटवला.

राज्यातील मालकाच्या आदेशाने गुप्त बैठक होऊन ‘सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणजेच सहकार’ हा कायमचा मारून टाकायचा नाही. यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या तिजोऱ्यांच्या चाव्या आपल्या ताब्यात राहायला हव्यात आणि ही कोंबडी देखील आपल्याच खुराड्यात राहिला हवी. याची अक्कल पुन्हा जागृत झाल्याने आपापली सोन्याची अंडी गोळा करत बसायची त्यातून आपापले महाल उभे करायचे. आणि टिकवायचे. हेच महत्त्वाचे आहे याची जाणीव पुन्हा झाल्यावर अचानकपणे सहकारातल्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकाला त्रास न देता जवळजवळ बिनविरोधपणे पार पडल्या आहेत.

“आपले विरोधक आपणच संपवू आणि एकमेका सहाय्य करू” या नवीन युक्तीने एकत्र येऊन पुन्हा लुटुपुटूची लढाई दाखवत केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची आता खबरदारी घेतली जाईल. पूर्वेकडच्या युवराजांचे चांगले पुनर्वसन होईल किंवा निवडणुकीच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यासाठी इकडील युवराज आणि सुभेदार त्यांना मदत करतील. तिकडचे, पूर्वेकडचे थोरले सुभेदार वतनदाऱ्या टिकवण्यासाठी ‘आपल्याच खबऱ्यांचा बळी’ देण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. या सर्व गडबडीत ‘राजकन्येला सत्तेच्या खुर्चीची संधी’ मिळेल. इकडचे युवराज आणि त्यांच्या पिताश्रींचे राजकारण मात्र लटकतेच राहते की काय असा प्रश्न निर्माण होईल….. आणि मग पुन्हा दोन्ही कडचे खबरे नेहमीप्रमाणे सुपार्या घेत, राजकीय आरडाओरडा करीत सतरंज्या उचलण्याच्या कामाला लागतील.
