‘एसएमबीटी’ कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात तर व्हॉइस चेअरमनपदी पांडुरंग पा. घुले यांची एकमताने निवड

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 13 —

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडली. कारखान्याच्या चेअरमनपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची तर व्हा.चेअरमन पदी ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील घुले यांची एक मताने निवड झाली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृह येथे प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याच्या चेअरमनपदाची निवड झाली. चेअरमन पदासाठी बाळासाहेब थोरात यांच्या नावाची सूचना संपतराव गोडगे यांनी केली तर संतोष हासे यांनी अनुमोदन दिले. आणि व्हाईस चेअरमन पदासाठी पांडुरंग दामोदर घुले यांच्या नावाची सूचना विजय राहणे यांनी केली तर विलास शिंदे यांनी अनुमोदन दिले.

यावेळी नवनिर्वाचित संचालक इंद्रजीत थोरात, इंद्रजीत खेमनर, सतीश वर्पे, डॉ. तुषार दिघे, रामनाथ कुटे, नवनाथ आरगडे, विनोद हासे, गुलाबराव देशमुख, रामदास धुळगंड, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, दिलीप नागरे, अंकुश ताजणे, लताताई गायकर, सुंदरबाई दुबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रादेशिक कार्यालयाचे उमेश कुलकर्णी, प्रवीण चव्हाण आदी उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा कारखाना येथे सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, डॉ.जयश्री थोरात, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी, शंकर खेमनर, संपत डोंगरे, आर.बी राहणे, रामहरी कातोरे, विश्वास मुर्तडक, आदीसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्त, काटकसर पारदर्शकता या आदर्श तत्त्वावर व विचारांवर संगमनेरचा सहकार व कारखान्याचे काम सुरू आहे. सर्व निर्णय हे एकमताने आणि एक विचाराने बिनचूक व अचूक घेतल्याने यशस्वी वाटचाल सुरू आहे. महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी मध्ये अनेक अडचणी आहेत. खासगी साखर कारखान्यांचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. प्रत्येक सीझन हा नवीन प्रश्न घेऊन येत असतो. कारखान्याचे अनेक प्रश्न केंद्र सरकारशी निगडित असतात. यापुढील काळातही यशस्वी वाटचाल आपल्या सर्वांना कायम ठेवायची आहे.

कारखाना निवडणुकीपूर्वी अनेक अफवा आल्या पण सभासद व जनतेने निवडणूक बिनविरोध केल्याने तो फुगा फुटला. संगमनेर तालुक्याने एक वेगळी राजकीय संस्कृती निर्माण केली आहे. येथे बंधू भावाचे वातावरण आहे. विरोधकांचाही कधी व्यक्तिदोष कोणी केला नाही. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेली. सहकार हा निकोप व पारदर्शक पद्धतीने चालतो आहे. राज्यामध्ये विकसित व वैभवशाली असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये संगमनेरचा समावेश होतो आहे. मात्र या चांगल्या राजकीय संस्कृतीची काळजी करावी लागणार आहे.

आता वातावरण बदलले आहे. तालुक्यात दहशत वाढते की काय असा प्रश्न आहे. सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल याचा विचार करा. कुणाचीही गुलामगिरी स्वीकारू नका. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. सर्वांनी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने लढा. कार्यकर्त्यांनी आपल्या घरातील युवकांना पहिली आपल्या तालुक्याची संस्कृती समजून सांगा. आगामी काळामध्ये तालुक्यामध्ये एकरी उत्पादन वाढवण्यासाठी जास्त काम करावे लागेल असेही ते म्हणाले.

तर डॉ. तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या सहकार हा देशाला दिशादर्शक आहे. महाराष्ट्रातील सहकारातील नेतृत्व म्हणून राज्यातील लोक थोरात साहेब यांच्याकडे पाहत असून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

तर पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासद शेतकरी यांनी नवीन संचालक मंडळाला बिनविरोध निवडून देऊन काम करण्याची संधी दिली आहे. मागची परंपरा कायम राखत चांगले काम करू असे ते म्हणाले यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी सभासद व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!