हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर प्रतिनिधी दि. 25
कॉम्रेड दत्ता देशमुख, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्यापासून सुरू झालेल्या पाण्याचा लढा आपण सुरू ठेवला. निळवंडे धरण व कालवे अनेक अडचणींवर मात करून पूर्ण केले. मात्र याची जाणीव कुठे आहे. असा प्रश्न विचारताना सातत्याने केलेले काम कसे विसरले, काम करणाऱ्याच्या पाठीशी नेहमी उभे राहिले पाहिजे असे सांगताना निळवंडेचे हक्काचे पाणी लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेच पाहिजे हा आपला ध्यास असून त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे धरण व कालव्यांचे निर्माते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

पिंपरणे येथे कारखान्याच्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रणजीतसिंह देशमुख, डॉ.जयश्री थोरात, नानासाहेब शिंदे, मीनानाथ वर्पे, शांताराम कढणे, भास्कर बागुल आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, मोठा संघर्ष करून 1989 मध्ये भंडारदराचे हक्काचे 30 टक्के पाणी मिळवले. तळेगाव सह दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता निळवंडे धरण व कालव्यांचा सातत्याने पाठपुरावा आपण केला. कोणतेही काम एका दिवसात होत नाही त्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. अनेक अडचणीतून मार्ग काढत धरण आणि कालवे पूर्ण केले. यामध्ये स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी मदत केली. या व्यतिरिक्त कोणीही मदत केली नाही. निळवंडे चे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात गेले पाहिजे हा आपला ध्यास आहे.

डाव्या व उजव्या कालव्यांच्या वरच्या भागात सुद्धा पाणी नेण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या पुढेही यासाठी सातत्याने काम करणार असून संगमनेर तालुक्याच्या हक्काचे पाणी हे तालुक्याला मिळालेच पाहिजे. दोन्ही कालव्यांमध्ये अगोदर तालुक्यातील हक्काच्या पाण्यासाठी पाईप टाका आणि मग काँक्रिटीकरण करा अशी मागणी करताना तालुक्यातील जनतेने आपले सुसंस्कृत राजकारण जपले पाहिजे असे सांगितले.

याचबरोबर मागील काही दिवसातच शांत सुसंस्कृत संगमनेर शहर अशांत होत चालले आहे. याची जाणीव करून देताना आपल्याला शांततेचे बंधूभावाचे व विकासाचे वातावरण टिकवायचे आहे. यासाठी झाले गेले सर्व विसरून सर्वांनी एकत्र राहून काम करावे.चांगल्या राजकारणाची परंपरा आपण यापुढेही जपणार असून झालेले सर्व पुन्हा दुरुस्त करू यासाठी सर्वांनी एकत्र राहावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, तालुक्यातील सभासद शेतकरी यांचा लोकनेते थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास असून कारखान्याच्या निवडणुकीमध्ये माघार घेतलेल्यांचे कौतुक त्यांनी केले. याप्रसंगी खराडी, रायते, रायतेवाडी, वाघापूर, अंभोरे, कोळवाडे, पिंपरणे, जाखुरी, देवगाव, निमगाव टेंभी, शिरापूर, हिवरगाव पावसा येथील सभासद शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
