दुष्काळी भागाला निळवंडेचे पाणी मिळाल्याने स्वप्नपूर्ती – लोकनेते बाळासाहेब थोरात

 जातीयवादी, धर्मवादी राजकारणाला फसवू नका डॉ. सुधीर तांबे 

संगमनेर  प्रतिनिधी  दि. 24

निळवंडे धरण पूर्ण करून उजवा आणि डावा कालवा बांधून या धरणाचे पाणी तळेगावसह दुष्काळी भागाला मिळवून देणे हे आपल्या जीवनातील महत्त्वाचे ध्येय होते. त्यासाठी आपण सातत्याने काम केले आणि अडचणींवर मार्ग काढला. त्या वेळेस कुणीही मदत केली नाही. उलट अडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा कठीण परिस्थितीतून सातत्यपूर्ण वाटचालीतून आपण हे धरण व कालवे पूर्ण केले आहे. आता कालव्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला पाणी मिळाल्याने स्वप्नपूर्ती झाली असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

तळेगाव दिघे येथे कारखान्याच्या वतीने आयोजित सभासदांच्या स्नेहसंवाद मेळावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, अंकुश ताजणे, हौशीराम सोनवणे, भारत मुंगसे, सुभाष सांगळे, प्रभाकर कांदळकर, बाबासाहेब कांदळकर, अनिल कांदळकर, किसनराव सुपेकर, संजय पोकळे, आत्माराम जगताप, सचिन दिघे, सखाराम शरमाळे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, निळवंडे धरणाची निर्मिती करून तळेगाव सह दुष्काळी भागाला पाणी देणे हे आपल्या जीवनाचे महत्त्वाचे ध्येय होते. आणि आता कालव्यांद्वारे पाणी आल्याने या भागात समृद्धी येणार आहे. मात्र काहीजण इतिहासाची पुनरावृत्ती चुकीच्या पद्धतीने करत आहे. निळवंडे धरण व कालव्याच्या निर्मितीतील आपले योगदान कुणीही नाकारू शकत नाही.

संपूर्ण देशात सहकार मोडकळीस आला असताना थोरात कारखान्याने आपला विकासाचा आलेख कायम उंचावत ठेवला आहे. या कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. मात्र सुज्ञ सभासद व कार्यकर्ते यांनी आपल्यावर विश्वास दाखवत ही निवडणूक बिनविरोध पार पाडली.

अतिशय संघर्षातून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. कारखाना ही अमृत उद्योग समूहातील मातृसंस्था असून कारखाना अडचणीच्या काळात कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या कडव्या शिस्तीवर या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू असून ही समृद्ध परंपरा आपण कायम जोपासणार आहोत. कारखाना उभारणीत तळेगाव भागातील गावांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्स गोळा करून मोलाची मदत केली. उचांकी भावासह पारदर्शक काम हे वैशिष्ट्य आहे. को जनसह वीज निर्मिती प्रकल्प आदर्शवत आहे. स्वार्थासाठी आपण कारखान्यातून दारू निर्मिती केली नाही. संसारात माती कालवण्याचे काम आपण करत नाही.

आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा करून तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी 81 कोटी रुपये निधी मिळवला. त्यामुळे या भागात नवीन पाईपलाईन आली. मात्र ज्यांना हे काम माहित नाही ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. भोजपुर चारीसाठी आपण सातत्याने काम केले मात्र आता काहीजण भोजापुर बाबत वेगळ्याच अफवा निर्माण करत आहेत. आपले अहित चिंतनारे वेळीच ओळखा. पुढील काळातही निळवंडे धरणाच्या कालव्यांचे पाणी उर्वरित भागाला मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. हक्काच्या पाण्याच्या संघर्षासाठी आपण सदैव तयार असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.

डॉ.तांबे म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी विकासाची दूरदृष्टी ठेवून कारखान्याची निर्मिती केली. आणि ही यशस्वी वाटचाल लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सुरू ठेवली. आज कारखाना देशात नावाजलेला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दादांची मूल्ये जोपासली व सहकाराची चळवळ शिखरावर नेली. मात्र सध्या खोटे प्रचाराचे तंत्र निर्माण झाले असून चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू आहे. जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद निर्माण करून राजकारण केले जात आहे. याला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, निळवंडे धरणाच्या पाण्याने या भागाचे आता नंदनवन झाले आहे. ज्यांचे या धरणात काहीही योगदान नाही ते आता मोठा गावगवा करत आहे. कारखाना हा कायम अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून ऊस उत्पादक सभासदांनी मोठा विश्वास दाखवत ही निवडणूक बिनविरोध केली आहे. यावेळी परिसरातील सभासद शेतकरी युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पहलगाव येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध : दहशतवादाचा समूळ नायनाट करा

 

उपस्थित सर्व सभासद, शेतकरी, महिला व युवकांनी मेणबत्ती पेटवून पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. हा हल्ला मानवतेला काळीमा फासणारा असून आतंकवादाचा समूळ नायनाट झालाच पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने ठोस कारवाई करावी अशी आग्रही मागणी यावेळी काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!