जनसुरक्षा विधेयका विरोधात माकपचा संगमनेर प्रांत कार्यालयावर मोठा मोर्चा 

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 23 

व्यक्ती व संघटनांना बेकायदा ठरविण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारच्या हातात देणाऱ्या जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात आज डावे पक्ष व समविचारी संघटनांनी राज्यभर तीव्र आंदोलन केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. अकोले व संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक या मोर्चात सहभागी झाले होते. जनसुरक्षा विधेयका विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.

राज्य सरकार, शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हा कायदा येत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षामध्ये सरकारच्या धोरणाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेच्या विरोधात या विधेयकामुळे सरकारच्या हातात कारवाईचे बेसुमार अधिकार एकवटणार आहेत. सरकारी धोरणांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनांना राज्य सरकार बेकायदेशीर ठरवून त्याच्यावर कारवाई करू शकणार आहे. दोन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा व अशी व्यक्ती, व्यक्तीचे नातेवाईक व अशा संघटनांच्या मालमत्ता जप्त करण्याचे अमर्याद अधिकार या विधेयकाच्या अन्वये राज्य सरकारला प्राप्त होणार आहेत. राज्य सरकारच्या धोरणांची व निर्णयांची कोणत्याही प्रकारची चिकित्सा करणे यामुळे अशक्य होऊन जाणार आहे. केवळ राजकीय पक्ष किंवा संघटनाच नव्हे तर पत्रकार, बुद्धिजीवी, कवी, लेखक, यूट्यूब चैनलचे चालक, कुणीही सरकारच्या धोरणाची चिकित्सा करू शकणार नाही. सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर सरकार या कायद्यान्वये कारवाई करू शकणार आहे. संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारावर हा घाला आहेच शिवाय सर्व प्रकारच्या अभिव्यक्तींचा संकोच करणारी ही कृती आहे. महाराष्ट्रातील डावे पक्ष, समविचारी संघटना यांच्या पुढाकाराने या विरोधात आज जोरदार आंदोलने करण्यात आली. राज्यभरातील पत्रकारांनी नुकतेच सरकारचे या प्रश्नाकडे लक्षवेधक जन सुरक्षा विधेयक मागे घेण्याची मागणी केली होती.

संगमनेर शहरातील स्वातंत्र्य चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाजवळ अकोले व संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक यावेळी एकत्र आले. संगमनेर शहरातील समविचारी संघटनांचे कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य चौकातून मोर्चाची सुरुवात करण्यात आली. प्रचंड घोषणा देत मोर्चा शहरामध्ये फिरवत संगमनेर प्रांत कार्यालयावर घेण्यात आला. येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये वक्त्यांनी राज्य सरकारच्या लोकशाही विरोधी कृतींवर जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे शेतकरी, शेतमजूर, कामगार, आशा कर्मचारी, अंगणवाडी ताई, बांधकाम कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी, युवक, विद्यार्थी व महिला या जन विभागांवर आपल्या धोरणांच्या माध्यमातून हल्ले करायचे. या श्रमिक जनतेला आपल्या धोरणांमुळे जगणं नकोस करायचं व दुसऱ्या बाजूला सरकारच्या ह्या अन्याय्य धोरणाविरुद्ध जनतेने आवाज उठवू नये म्हणून त्यांचा आवाज जन सुरक्षा सारखी विधेयके आणून दाबून टाकायचा. सरकारची ही कृती संविधान विरोधी व लोकशाही विरोधी आहे. महाराष्ट्राची जनता अशी दादागिरी बिलकुल खपवून घेणार नाही असे प्रतिपादन यावेळी डॉ. अजित नवले यांनी केले.

कॉम्रेड सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ताराचंद विघे, नंदू गवांदे, नशीब वरपे, वसंत वाघ, हेमलता शेळके, गणेश ताजने, संगीत साळवे, रंजना पराड, अनिता साबळे, निर्मला मांगे, नंदा म्हसे, द्रौपदा रावते, प्रकाश साबळे, शिवराम लहामटे, मथुराबाई बर्डे, आशा घोलप, अविनाश धुमाळ, लक्ष्मण घोडे, सुनील बांडे, काळू मेंगाळसर आदींनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!