जगद्गुरू तुकोबारायांच्या अंभंगांनी दुमदुमला आनंदडोह !
शेकडो नागरिकांच्या सहभागाने ‘गाथा पुनरुत्थान दिन’ साजरा
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क दि. 6
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची गाथा सनातन्यांनी १७ व्या शतकात देहू येथील इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्यानंतर ती १३ दिवसांनी पुन्हा तरली अर्थात त्यांचे अभंग पुन्हा प्राप्त झाले, तो दिवस म्हणजे ‘गाथा पुनरुत्थान दिन.’ हा दिवस साजरा करण्यासाठी नुकतेच शेकडो नागरिक इंद्रायणीच्या त्याच डोहाजवळ जमले आणि त्यांनी तुकोबारायांच्या अभंगांचे सामूहिक गायन केले. त्यात गावोगावांहून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांसह वारकरी, विद्यार्थी, अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता.

तुकाराम महाराजांची गाथा तरली ती तिथी चैत्र शुद्ध तृतियेची असल्याचे अभ्यासकांनी शोधून काढले आहे. त्यामुळे त्या दिवशी येणाऱ्या दिवशी ‘गाथा परिवार’ या संस्थेतर्फे हा आनंदाचा दिवस ‘गाथा पुनरुत्थान दिन’ साजरा केला जातो. या वर्षी हा दिवस गेल्या सोमवारी साजरा करण्यात आला. त्यासाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून तुकाराम महाराजांना मानणारे शेकडो भाविक, वारकरी देहू येथे जमा झाले होते. त्याबरोबर देहू येथील स्थानिक नागरिक, शिक्षक-विद्यार्थी, वारकरी प्रशिक्षण शाळांचे विद्यार्थी हेही सहभागी झाले होते.

यानिमित्त सकाळी देहू येथील मुख्य मंदिरापासून ते आनंद डोहापर्यंत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे गायन करत पायी दिंडी काढण्यात आली. त्याचे उद्घाटन देहूचे माजी सरपंच मधुकर कंद यांच्या हस्ते झाले. ‘गाथा परिवार’चे अध्यक्ष ह.भ.प. श्री. उल्हास महाराज पाटील या वेळी उपस्थित होते. ही दिंडी आनंद डोहाजवळ (जिथे तुकारम महाराजांची गाथ तरली तो डोह) पोहोचल्यानंतर सर्वांनी इंद्रायणीच्या नदीत व घाटावर उभे राहून सामुहिकरित्या अभंगांचे वाचन केले. सकाळच्या वेळी तुकोबांचे अभंगांचे स्वर वातावरणात पसरले, तेव्हा संपूर्ण वातावरण भारावून गेले. अभंगांचे गायन होत असताना जणू ४०० वर्षांपूर्वीच्या तुकोबारायांच्या काळात गेल्याची अनुभूती अनेक अबाल-वृद्धांनी घेतली.

या अभंग गायनानंतर प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. त्यात पंढरपूर येथील ह.भ.प. श्री. भारत महाराज जाधव यांचे मुख्य प्रवचन झाले. ते म्हणाले, ‘अनेक सत्पुरुषांनी समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केली, त्यांना धर्ममार्तडांनी त्रास दिला. मात्र, तिकाराम महाराजांचे अभंग त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत देतात. त्यामुळेच त्यांचे अभंग पुन्हा मिळाले तेव्हा केवळ त्यांची गाथा तरली नाही, तर अवघे विश्वच तरले.’ अध्यक्षस्थानावरून बोलताना ह.भ.प. उल्हासमहाराज पाटील म्हणाले, ‘तुकाराम महाराज हे क्रांतिकारक संत होते. त्यांनी अभंगांमधून नेहमीच समाजातील कु-प्रवृत्तींवर आघात केला. म्हणूनच तत्कालीन धर्मसत्तेने त्यांच्यावर खटला दाखल करून त्यांचे अभंग असलेली गाथा बुडवण्यात आली. त्याच्याविरोधात तुकोबांनी धर्मसत्तेशी लढा दिला आणि इंद्रायणीच्या काठी १३ दिवस उपोषण केले. हे उपोषण म्हणजे ‘अभिव्यक्तीचा अधिकारा’साठी दिलेला लढाच होता. त्यामुळे आजच्या काळातही तुकोराम महाराज, त्यांनी दिलेला लढा आणि त्यांचे अभंग महत्त्वाचे ठरतात.’

या कार्यक्रमाला देहूचे माजी सरपंच मधुकर कंद, ह.भ.प. डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण, राष्ट्र सेवा दलाचे अर्जुन कोकाटे, डॉ. चंद्रकांत कोलते, किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी, अभिजित घोरपडे, रवीतात्या कंद, आदी. उपस्थित होते. त्यानंतर तुकोबांच्या भजनांचे गायन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. देहू आण जुन्नर येथील श्री. रामकृष्ण अय्यर व सहकारी तसेच, डॉ. ज्ञानेश्वर गुळिग आणि इतरांनी सुस्वर अभंग गायले.
