रस्तालुटीचा बनाव
फिर्यादीच निघाला आरोपी : चौघांना अटक
घारगाव पोलिसांची कारवाई
घारगाव प्रतिनिधी दि. 26
नासिक पुणे महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रस्ता लुटीच्या गुन्ह्याची उकल करण्यात घारगाव पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी फिर्यादीच आरोपी निघाला असून त्याच्यासह चौघांच्या टोळीला पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे. फिर्यादीने खोटी माहिती देत अन्य तिघांच्या साहाय्याने हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.

३१ जानेवारीला रात्री पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक मध्ये प्रवासी म्हणून संगमनेरला जाण्यासाठी बसलेल्या दोघाजणांनी पिस्तूलचा धाक दाखवत ट्रक चालकाला बेशुद्ध करून त्याच्या ताब्यातील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे शेतीचे औषध लंपास केल्याची घटना नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे या प्रकरणी तपास करत होते.

३१ जानेवारीला मध्यरात्री दिपक किसन कदम (वय ४२ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. राजगुरूनगर, वाडा, ता. खेड, जि. पुणे) हा ५,७२,२१४ रुपये किंमतीची शेतीची औषधे भरलेली पिकअप (एम.एच. ४२ एक्यु. ८०७८) घेवुन पुणेकडुन नाशिककडे जात असताना चाळकवाडी टोलनाका येथून दोन प्रवाशांनी लिफ्ट मागीतल्याने त्यांनी दोन प्रवाशी बसविले. त्यांना घेऊन कदम घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत माहुली घाट (खंदरमाळ) येथे आला असताना मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोघा प्रवाशांपैकी एका प्रवासाने बाथरूमला लागल्याचे सांगत गाडी थांबविली. तर गाडीत असलेल्या दुसऱ्या प्रवाशाने त्याच्याकडील गावठी कट्टा चालक कदम यांच्या कमरेला लावला. तर दुसऱ्या प्रवासाने ड्रायव्हर साईटने केबिनमध्ये चढत पांढरा रुमाल चालकाच्या नाकाला लावून बेशुद्ध केले. चालकाला सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शुद्ध आली असता गाडीमध्ये शेतीमालाची कोणतीही औषधे नव्हती. त्यामुळे त्याने गाडी मालकाला सदरची घटना कळविली व आळेफाटा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली.

सदरचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आळेफाटा पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी हा गुन्हा घारगाव पोलिसांकडे वर्ग केला होता. घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४),३(५) सह शस्त्र अधिनियम कलम ३, ३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते.

पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांच्याकडे सोपविला होता. दाभाडे यांनी सर्व घटनाक्रम लक्षात घेत तपासाला सुरुवात केली. हिवरगाव पावसा व चाळकवाडी येथील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फिर्यादीच्या मोबाईलचे सीडीआर काढण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दाभाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासांती आणखी माहिती मिळवत आरोपी साईदास रघुनाथ गाडेकर (वय २७ वर्ष, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. निमगाव निघोज, ता. राहाता. जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेवन त्याचेकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा चालक दिपक किसन कदम (वय ४२ वर्षे, रा. वाडा, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे), तेजस प्रकाश कहाणे (वय २१ वर्षे, रा. वाडा, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) व नवनाथ दादाभाऊ शिंदे (वय २८ वर्ष, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांचे मदतीने केल्याचे कबूल केले. तसेच त्याचेकडुन गुन्हयातील जबरी चोरी गेलेला माल एम.एच. ४२ एक्यु. ८०७८ यामध्ये लपून ठेवला होता तो देखील ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी एकूण १५ लाख १२ हजार २१४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये शेती औषधांसह पीक अप, मोबाईलचा समावेश आहे.
