संगमनेर जोशी स्वीट प्रकरण ; कारवाई थांबवण्यासाठी….
सत्ताधारी बड्या युवा नेत्याचा अधिकाऱ्यांवर दबाव !
प्रतिनिधी दिनांक 16
संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध जोशी स्वीट होम या मोठ्या मिठाई दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभाग अहिल्यानगर यांच्याकडून कसून तपासणी आणि चौकशी सुरू आहे. यामध्ये या स्वीट होमच्या पदार्थांविषयी तक्रारी करण्यात आल्यानंतर काही नमुनेही घेण्यात आले. सुरुवातीचा एक अहवाल देखील सादर करण्यात आला आहे. यानंतरही काही पदार्थांचे नमुने घेतले जाण्याची शक्यता असून या सर्वांचे रिपोर्ट आल्यानंतर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली जाणार असल्याने ही सर्व कारवाई थांबवण्यासाठी नगर जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील एका बड्या युवा नेत्याने संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचे वृत्त समजले आहे.

विशेष म्हणजे जोशी स्वीट होमवर कारवाई सुरू झाल्या झाल्याच या बड्या युवा नेत्याने अधिकाऱ्यांवर दबाव आणून कुठलीही माहिती बाहेर देऊ नका असा आदेश दिला असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे अन्नपदार्थांचे लॅब मधील रिपोर्टर काय परंतु कारवाई कोणत्या पद्धतीने सुरू आहे याची माहिती देखील देण्यासाठी संबंधित अधिकारी घाबरत असल्याचे दिसून येते.

मात्र यामध्ये काही सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या असून अन्न व औषध प्रशासन मंत्री यांची भेट घेऊन अहवालातील सत्य त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन आयुक्तांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा अहवालासह तक्रारी करणार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान जोशी स्वीट होम संदर्भात सादर करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या त्रुटी ह्या स्वीट होम चालकाला आणि दुकानाला अडचणीत आणण्यासारख्या आहेत असे संबंधित खात्याकडून सांगितले जात आहे. तसेच दबावावर मौन बाळगून प्रतिक्रिया दिली जात नसली तरी कारवाईची प्रक्रिया मात्र टप्प्याटप्प्याने सुरू आहे. त्यामुळे संबंधित विभाग दबाव पाळतो की झुगारतो हे भविष्यात दिसून येणार आहे तोपर्यंत मिठाई खाण्यास हरकत नाही.
