संगमनेरातील अतिक्रमण जैसे थे !
नवीन आमदारांचे प्रयत्न निष्फळ !!
पालिकेची दिखाऊ कारवाई…
प्रतिनिधी संगमनेर दि. 10
संगमनेर शहरातील अतिक्रमणांना पाठीशी घालणार नाही. कोणीही असो कारवाई केली जाईल असा इशारा देत संगमनेरचे नवीन आमदार अमोल खताळ पाटील यांच्या आदेशानंतर शहराला विद्रूप करणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दिल्ली नाका, संगमनेर बस स्थानक, बीएड कॉलेज रोड, विश्रामगृह परिसर, पुणे नाशिक मार्ग मार्गावरील फुटपाच्या ओठावरील अतिक्रमण, बीएड कॉलेजचा परिसर यासह विविध ठिकाणी अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र काही दिवसातच परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असून “नवीन आमदारांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत की ठरवले जात आहेत ?” यावर आता चर्चा सुरू आहे.

हे अतिक्रमण हटवताना विशेषतः रस्त्यावरील हातगाड्या, भाजी विक्रेते, फळांचे विक्रेते, खाद्यपदार्थांचे विक्रेते, कपड्यांचे विक्रेते यांना टार्गेट करण्यात आले होते. या परिसरातील ऑमलेट पावच्या गाड्या, बटाटेवडे पाव, पाणीपुरीच्या गाड्या, नव्याने सुरू झालेले मठ्ठा विक्रीचे हातगाडे हे सर्व हटविण्यात आले होते. मात्र काही दिवसानंतर परिस्थिती जैसे थे! पाहण्यास मिळत आहे.

या सर्व परिसरात अतिक्रम हटाव मोहीम म्हणजे गंमत जंमत सारखा प्रकार झाला आहे. सर्व संगणमताने आम्ही काही दिवस अतिक्रमण काढतो व नंतर करतो असा प्रकार नगरपालिका प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांमध्ये साट-लोट करून झालेला दिसतो. अतिक्रमण करणाऱ्यांनी पुन्हा आपापल्या जागा धरण्यास सुरुवात केली आहे.

पुणे नाशिक महामार्गावर बस स्थानकापासून असलेल्या रस्त्याच्या कडेला फुटपाच्या ओट्यांवर पुन्हा दुकाने सजू लागली आहेत. आपल्या स्वतःची मालकीची जागा असल्याप्रमाणे या जागा बळकवण्यात येत आहेत. पालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्याचा फक्त फॉर्स केला आहे. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दररोज फिरताना दिसत नाहीत. या कर्मचाऱ्यांचे देखील अतिक्रमण करणाऱ्या बरोबर लागेबंधे असल्याचे बोलले जात आहे.

नगरपालिकेने फक्त दिखाऊपणा केला असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे संगमनेरचे विद्रूपीकरण आणि अतिक्रमण नवीन आमदार आले काय आणि जुने आमदार गेले काय कुठलाही फरक पडणार नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
सगळे विभाग आणि पुढाऱ्यांची मिली भगत !
संगमनेर शहरात नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभागाने एकत्रित येत तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यासाठी संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेत अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. खताळ यांच्या सूचनेनंतर तीन दिवस शहरात ही मोहीम राबविण्यात आली. मात्र आता या मोहिमेतून संगमनेरकरांच्या हाती फारसे काही लागलेले दिसत नाही. टप्प्याटप्प्याने दहा-पंधरा दिवसांच्या कालावधीतच ही अतिक्रमणे पुन्हा एकदा पूर्ववत होऊ झाली आहेत. त्यामुळे या संयुक्त विभागाने केलेली कारवाई आता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे फार्स ठरली आहे. अतिक्रमणे पुन्हा पूर्ववत होणार असतील आणि अतिक्रमण धारकांना पाठीशी घातले जाणार असेल तर ही मोहीम नेमकी कशासाठी राबविली गेली असा प्रश्न संगमनेरकर उपस्थित करत आहेत.

बोलाचा भात आणि बोलाचीच कढी…
अतिक्रमण मोठी गंभीर समस्या बनली आहे. यामुळे अपघात वाढले असून शहराचा बकालपणा वाढला आहे. तर काही ठिकाणी लाखो रुपये खर्च करून गाळे खरेदी केलेल्या व्यावसायिकांना या अतिक्रमणाचा मोठा त्रास होत आहे. शहरातील काही भागात मोठ्या गाळे, फेरीवाल्यांसह गाळे घेतलेल्या गाळेधारकांनी देखील अतिक्रमण केले आहे. तर अनेक भागात दुचाकीवर, पायी चालणे अवघड झाले आहे. अकोले नाका परिसर, मोमिनपुरा, अशोक चौक, मेनरोड, बाजारपेठ, बसस्थानक परीसर, नेहरू चौक, नवीन नगर रस्ता, जाणता राजा मार्ग, सय्यद बाबा चौक, कुंभार आळा, अकोले रोड, विश्रामगृह परिसर, जयजवान चौक, गणेशनगर, आरेज कॉर्नर, मालदाडरोड अशा सर्व भागात अतिक्रमण वाढत आहे. फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे पायी चालतांना जीव मुठीत धरून चालावे लागते. या परिसरात अपघाताच्या देखील घटना घडल्या आहेत. बसस्थानकाजवळील बीएड कॉलेज कडे जाणाऱ्या रोडवर असलेला अनाधिकृत रिक्षा स्टॉपदेखील डोकेदुखी बनला आहे. शहरात असे अनेक रिक्षा स्टॉप बेकायदेशीरपणे सुरू आहेत आणि वाहतुकीला सुद्धा अडथळा करीत आहेत. या रिक्षा स्टॉपसह अतिक्रमणांना कायमस्वरूपी काढून टाकण्याची हिंमत संबंधित विभाग आणि नवे आमदार दाखविणार का असा प्रश्न उपस्थित होत असून “बोलाची भात आणि बोलाचीच कढी” असा प्रकार व्हायला नको असेही बोलले जात आहे.
