संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन !
नागरिकांना मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन
संगमनेर प्रतिनिधी दि. 15
संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीने पार पडलेल्या बैठकीत दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी संगमनेर प्रांत कार्यालयावर आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती कृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
बैठकीनंतर कृती समितीच्या सदस्यांनी आमदार अमोल खताळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली, भेट घेऊन संगमनेर बचाव कृती समितीची भूमिका समजावून सांगितली.

संगमनेर तालुक्यातील आश्वी या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय प्रस्थापित करण्यात आले आहे. मुळात या ठिकाणी कोणतेही मागनी नसताना उलटपक्षी अनेक गावांचा विरोध असताना सदर कार्यालय आश्वी येथे करण्याचा घाट घातला गेला आहे.
संगमनेर मधील पठार भागातील नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे की पठार भागातील नागरिकांना संगमनेरला जाणे अत्यंत गैरसोयीचे आहे. त्यामुळे सदर अप्पर तहसील कार्यालय आश्वी या ठिकाणी करण्याऐवजी पठार भागात घारगाव या मध्यवर्ती ठिकाणी करण्यात यावे.

अहिल्यानगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्याच्या सीमा या जिल्ह्याच्या ठिकाणाहून खूप दूरवर पसरलेल्या आहेत त्यामुळे संगमनेर येथील पठारभाग व अकोले तालुक्यातील नागरिकांना छोट्या मोठ्या प्रशासकीय कामकाज असेल ते करण्यासाठी शंभर ते दीडशे किमी एवढा प्रवास करावा लागतो. या भागातील बहुतांशी मागासवर्गीय आदिवासी समाज राहतो व जिल्ह्याचे अंतर जास्त असल्याने सर्वांना इतक्या दूर प्रवास करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक नागरिकांची प्रशासकीय कामे रखडून राहतात व अनेक योजना पासून देखील या नागरिकांना वंचित राहावे लागते. त्यामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने संगमनेरला जिल्हा घोषित करून जिल्हा अधिकारी कार्यालय संगमनेर येथे व्हावे.

तसेच पूर्वी पुणे – नाशिक रेल्वे मार्ग हा संगमनेर येथून प्रस्थापित होता. परंतु सध्या हाच मार्ग शिर्डी येथे वळवण्याची चर्चा सुरू आहे संगमनेर अकोले हा भाग अनेक वर्षापासून रेल्वेच्या अभावामुळे अनेक विकासाच्या संधी पासून वंचित राहिला आहे. तसेच सदर रेल्वे मार्ग हा संगमनेर येथून होणे सर्व नागरिकांच्या हिताचे होणार आहे. म्हणून रेल्वे मार्ग हा पूर्वी प्रस्थापित केल्याप्रमाणे संगमनेर येथूनच व्हावा या कृती समितीच्या प्रमुख मागण्या आहेत.
तरी संगमनेर बचाव कृती समितीच्या वतीने सर्व संगमनेरकर नागरिकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी कृती समितीच्या वतीने दत्ता ढगे, गणेश धात्रक, ॲड. अतुल पवार, माजी जि.प. सदस्य अजय फटांगरे, प्रशांत पानसरे, श्रीकांत राहणे, अमित फटांगरे, सोमनाथ रोडे, रवींद्र आखाडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
